– मेट्रोचे सीएमडी श्रावण हर्डीकर, भाडेवाढीमुळे प्रवासी संख्येत झाली होती घट
नागपूर ब्यूरो : तिकीट शुल्कात वाढ केल्यानंतर फेब्रुवारीमध्ये १.२५ लाखांवर असलेली मेट्रोची प्रवासी संख्या ५५ हजार रुपयांपर्यंत कमी झाली होती. पण ती आता ८० हजारांपर्यंत वाढली आहे. ही बाब भाडे कमी न करताच घडली आहे. प्रवासी संख्या २ लाखांवर नेण्याचे महामेट्रोचे लक्ष्य असल्याची माहिती महामेट्रोचे नवे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
मेट्रोला शहर बससेवा व इतर साधनांशी जोडणार
जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रोचा वापर करावा, यासाठी आम्ही प्रत्येक मेट्रो स्टेशनचा सविस्तर अभ्यास करीत असून मेट्रोला शहर बससेवा आणि वाहतुकीच्या इतर साधनांशी जोडणार आहोत. शहर बसेसचा वापर करण्यासाठी मोठी जनजागृती करावी लागेल. नागपूर मनपासुद्धा बस सेवेत सुधारणा करत आहे. ऑपरेशनल तोट्याबद्दल ते म्हणाले, सध्याच्या परिचालन खर्चाच्या ६० टक्के महसूल आहे. ऑपरेशनल ब्रेक साध्य करणे हे आमचे पहिले लक्ष्य आहे. पुढे प्रोजेक्ट ब्रेक इव्हन असेल, ज्यामध्ये आम्ही कर्ज आणि त्यांचे व्याज फेडण्यास सक्षम असणार आहोत. आम्ही नॉन-फेअर बॉक्स स्रोतांद्वारे ५० टक्के महसूल मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
ते पुढे म्हणाले, जाहिरातीद्वारे पैसे कमावण्याच्या आमच्या प्रयत्नांना आणि छोट्या व्यावसायिक जागा भाड्याने देण्याच्या आमच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु मोठ्या जागांच्या विकासासाठी वेळ लागतो आणि ते बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असते. खासगी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी निविदा अटींमध्ये सुधारणा करत आहोत.
प्रकल्पातील तांत्रिक त्रुटी झाल्यात दूर
मिहानमधील रेल्वे ओव्हरब्रिज (आरओबी), चौपदरी वाहतूक व्यवस्था आणि मिहान डेपोमधील बांधकाम व तांत्रिक दोषांबाबत ते म्हणाले, त्या सर्व बाबी किरकोळ आहेत. अशा बाबी प्रत्येक प्रकल्पात घडतात. प्रकल्प जुना होईल तेव्हा या बाबी आणखी वाढतील. त्या आम्हाला सामोरे जावे लागेल. या तिन्ही प्रकरणांमध्ये दुरुस्तीचे उपाय केले गेले आहेत.
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे तपासणी
मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या (सीएमआरएस) पथकाने गुरुवारी नागपूर मेट्रोची तपासणी केली. त्यात कॉटन मार्केट स्टेशन आणि मिहान डेपोची पाहणी केली. सीएमआरएसने सुरक्षा प्रमाणपत्र दिल्यानंतर कॉटन मार्केट स्टेशन नागरिकांसाठी खुले केले जाईल.