● नागपूरसह एकूण अन्यत्र २०० कोटी रुपयांच्या विकास कामांची श्री गडकरी यांची घोषणा
● महा मेट्रो तर्फे राबवलय जाणाऱ्या ५ विविध कामांचा यात समावेश
नागपूर ब्यूरो : महा मेट्रो तर्फे बांधल्या जाणाऱ्या प्रस्तावित मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायंस या प्रस्तावित भुयारी मार्गाचे भूमिपूजन आज (शनिवारी – 14 ऑक्टोबर 2023) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले. झिरो माईल मेट्रो स्टेशन जवळ हा सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी श्री गडकरी यांनी २०० कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाल्याची घोषणा केली. यात महा मेट्रो तर्फे राबवण्यात येणाऱ्या ५ विविध प्रकल्पांचा समावेश आहे.
भूमिपूजनासोबतच याच कार्यक्रमात झिरो माईल ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या मार्गाचे ‘स्व. दत्ताजी डिडोळकर मार्ग’ असे नामकरण देखील ना. श्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हा भुयारी मार्ग पूर्व, मध्य आणि दक्षिण नागपूरला पश्चिम नागपूरशी जोडण्याचे काम करणार आहे. ऐंशी कोटी रुपयांच्या या भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती ना. श्री. गडकरी यांनी या प्रसंगी संबोधन करताना दिली.
नागपूरसह विदर्भात अन्यत्र एकूण दोनशे कोटींची हि कामे होणार असल्याची घोषणा ना. गडकरी यांनी केली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २०२२-२०२३ या वर्षात एकूण २५ आरओबी आणि आरयूबी च्या बांधकामांना मुख्यतः मान्यता दिली आहे. यामध्ये महामेट्रो नागपूरतर्फे करण्यात येणाऱ्या पाच कामांचाही समावेश आहे. यामध्ये अमरावती ते नरखेड या रेल्वे मार्गावर आरओबीचे बांधकाम, कोलकाता रेल्वे मार्गावरील नाईक तलाव बांगलादेश ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन वैशाली नगर येथे आरयूबीचे बांधकाम, वर्धा रोडवरील मनीष नगर आरयूबीचे मनीष नगरपर्यंत पोचमार्गाचे बांधकाम, मनीष नगर रेल्वे क्रॉसिंग नागपूर येथे कमी उंचीच्या भुयारी मार्गाचे बांधकाम आदींचा समावेश आहे, असे ना. श्री. गडकरी यांनी सांगितले.
झिरो माईल ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या मार्गाचे ‘स्व. दत्ताजी डिडोळकर मार्ग’ असे नामकरण झाल्याची घोषणा करताना, महा मेट्रो तर्फे मानस चौक ते इन्स्टिट्यूट ऑफ सायंसदरम्यान बांधल्या जाणाऱ्या भुयारी मार्ग देखील स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या नावाने ओळखला जाणार असल्याचे ना. गडकरी यांनी या प्रसंगी सांगितले. आजवर अनेक रस्ते, उड्डाणपूल आणि टनेल्स केले, पण आज या मार्गाला आणि भुयारी मार्गाला दत्ताजींचे नाव देऊ शकलो, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब ठरते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
आजच्या या कार्यक्रमाला आमदार श्री कृष्णा खोपडे, आमदार श्री विकास कुंभारे, आमदार श्री प्रवीण दटके, वर्धेचे आमदार श्री पंकज भोयर, आमदार डॉ. रामदास आंबटकर, माजी खासदार श्री अजय संचेती, श्री अरुण लखानी, माजी आमदार प्रा. अनिल सोले, डॉ. उपेंद्र कोठेकर, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री अभिजित चौधरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जयंत पाठक, आभार प्रदर्शन श्री मनीष सोनी आणि सूत्र संचालन श्रीमती रेणुका देशकर यांनी केले.