Home Maharashtra #Nagpur | तळागाळातला प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत व्हावा – नितीन गडकरी

#Nagpur | तळागाळातला प्रत्येक व्यक्ती सुसंस्कृत व्हावा – नितीन गडकरी

24
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे पद्मश्री काजोल यांच्या हस्ते थाटात उद्घाटन

नागपुर ब्यूरो: खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा उद्देश केवळ मनोरंजन करणे हा नसून समाजाच्या तळागाळातला प्रत्येक व्यक्ती यशस्वी, आत्मविश्वासपूर्ण आणि सुसंस्कृत व्हावा,हा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री व खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे प्रणेते नितीन गडकरी यांनी येथे केले.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून साकारलेल्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्या नवव्या पर्वाला आज, शुक्रवार, 13 डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून संबोधित करीत होते.

हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात कलागुणांचा संगम असलेल्‍या या प्रसिद्ध महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री काजोल यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संस्कार भारती च्या अध्यक्ष कांचन गडकरी, ह्युंदाई सीडी चे जिओलिक ली, पूनित आनंद, महिंद्रचे अभिजित कळंब, जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर, माजी खा. दत्ता मेघे, सर्व आमदार चरणसिंग ठाकूर, प्रवीण दटके, कृष्णाजी खोपडे, कृपाल तुमाने, डॉ गिरीश गांधी, ना गो गाणार, सुलेखा कुंभारे, मल्लिकार्जुन रेड्डी, जितेंद्र बंटी कुकडे व इतर प्रामुख्याने उपस्थित होते.

Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

नितीन गडकरी व कांचन गडकरी यांच्या हस्ते काजोल यांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. नितीन गडकरी यांनी काजोल यांची आजी प्रसिद्ध अभिनेत्री शोभना समर्थ आणि पती अजय देवगण यांचा उल्लेख करताना त्यांच्या कार्याचा गौरव केला व महोत्सवाला हजेरी लावल्याबद्दल आभार मानले. ते नंतर म्हणाले की, केवळ मनोरंजनच नाहीतर जनतेची सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती व परंपरागत मूल्ये कला व लोकप्रबोधनाच्या माध्यमातून सर्वदूर पोहचावी हा या महोत्सवाचा हेतू आहे. रस्ते, वीज, दळणवळण यासोबतच साहित्यिक व सांस्कृतिक दर्जा वाढल्यानंतरच शहराचा विकास होतो. अनेक कलाकारांच्या उपस्थितीने हा महोत्सव फुलतो व प्रतिष्ठेचा होतो. यंग टॅलेंटला वाव देणारा हा उत्सव जनतेच्या आवड व आनंदाचा ठेवा आहे, असे उद्गार गडकरी यांनी काढले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रेणुका देशकर व बाळ कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. अनिल सोले यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, ऍड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांचे सहकार्य लाभत आहे.

प्रेम आणि सन्मानाबद्दल कृतज्ञ – काजोल

पीत – चंदेरी वस्त्रात आलेल्या कुशल अभिनयसंपन्न व्यक्तिमत्वाच्या धनी असलेल्या अभिनेत्री काजोलने मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात करताच रसिक सुखावले. काजोल यांची उपस्थिती आणि लाघवी बोलण्याने श्रोते मंत्रमुग्ध झाले. कलाविष्कार बघण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगत, अतूट प्रेम आणि सन्मानासाठी त्यांनी नागपूरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

काजोल यांनी नितीन गडकरी यांच्या कार्याचे कौतुक करताना या महोत्सवामुळे हजारो कलावांताना मंच उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. काजोल यांनी हर्षन कावरे या कलाकाराने काढलेली त्यांच्या रांगोळी प्रतिमेचे कौतुक केले आणि फोटो काढून घेतला

संस्कार भारती तर्फे – ‘मैं हूं भारत !’

महोत्‍सवाचे उद्घाटन झाल्‍यानंतर संस्‍कार भारती, नागपूर तर्फे ‘मैं हूं भारत’ हा भारतीय इतिहासाची गौरवशाली गाथा विशद करणारा व बाराशे कलावंतांचा सहभाग असलेला भव्य सांस्कृतिक कार्यक्रम झाला. वेदकाळापासून आज पर्यंतचा भारताचा प्रदीर्घ इतिहास भक्तिगीते, देशभक्तीची नवी गीते, शास्त्रीय व लोकनृत्य, पोवाडा, गोंधळ अशा विविध कलाप्रकारांतून यावेळी उलगडला गेला. या कार्यक्रमाचे मुख्य संयोजन गजानन रानडे, अमर कुळकर्णी आणि आनंद मास्टे यांचे होते. दीपाली घोंगे, मंगेश बावसे, सारंग मास्टे, अभिषेक बेल्लारवर यांनी नाट्य तर अवंती काटे, कुणाल आनंदम् यांनी नृत्य विभागाचे संयोजन केले. नेपथ्य सुनील हमदापुरे यांचे होते. शंतनु हरिदास, प्रसाद पोफळी, नीरज अडबे, आसावरी गोसावी, श्रीकांत बंगाले, अभिजीत बोरीकर, संजय खनगई, अक्षय वाघ, प्रदीप मारोटकर, मनोज श्रोती कार्यक्रम समन्वयक होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कार भारतीचे नागपूर महानगर अध्यक्ष वीरेंद्र चांडक, कार्याध्यक्ष डॉ. मृणालिनी दस्तुरे आणि शहर मंत्री मुकुल मुळे यांचे सहकार्य लाभले.

आज महोत्सवात…

सकाळी ७ वा. भक्तिमय वातावरणात श्री हनुमान चालीसा पठण व सायं. ६ वा. ‘अपने अपने राम’ अंतर्गत डॉ. कुमार विश्वास यांचे मर्मज्ञ प्रवचन होईल.

23 रोजी जुबिन नौटियाल

खासदार सांस्कृतिक महोत्सव चा पूर्वीच्या वेळापत्रकानुसार 22 तारखेला समारोप होणार होता परंतु आता डिसेंबर रोजी प्रसिद्ध पार्श्र्वगायक जुबिन नौटियाल यांच्या लाईव्ह इन कन्सर्ट ने होणार आहे. शहरातल्या युवा वर्गाला आणखी एक आनंदपर्वणी ठरणार आहे.