Home Health #Nagpur | कसा असेल डायग्नोस्टिक्सचा आगामी ट्रेंड?

#Nagpur | कसा असेल डायग्नोस्टिक्सचा आगामी ट्रेंड?

63

व्हीएपीएमच्या दोन दिवसीय वार्षिक परिषदेत विविध विषयांवर मंथन

नागपूर ब्यूरो : डायग्नोस्टिक्सचे आगामी ट्रेंड, हिस्टोपॅथॉलॉजी आणि हेमॅटोलॉजीमधील आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भूमिका, कार्डियाक मार्कर, हेमोलाइटिक ॲनिमिया, नवजात कावीळ आणि थायरॉईड एफएनएसी आणि हिस्टोपॅथॉलॉजी, एंडोमेट्रियल बायोलॉजी आदी विषयांवर विदर्भातील पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्टच्या वार्षिक परिषदेत मंथन करण्यात आले.

विदर्भ असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट आणि मायक्रोबायोलॉजिस्टच्या वतीने नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे 11 आणि 12 जानेवारी रोजी आठव्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण विदर्भातील तसेच छत्तीसगढमधील प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. एम्सचे संचालक डॉ. पी. पी. जोशी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीन डॉ.श्रीमती फाटक, डॉ. अनुश्री चौधरी उपस्थित होत्या.

 

यावेळी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय प्राध्यापकांनी पॅथॉलॉजीच्या विविध विषयांवर व्याख्याने दिली. डायग्नोस्टिक्सच्या आगामी ट्रेंडसह पॅथॉलॉजीशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. पराग धारप आणि डॉ. मॅथ्यूज यांनी सीबीसी, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि इन्स्ट्रुमेंट्सच्या विविध विषयांवर प्रकाश टाकला. यावेळी टीएमएच मुंबईतील डिजिटल पॅथॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. राजीव कुमार यांना डॉ. पैठणकर सन्मान देण्यात आला तर ‘आसावली’ प्रयोगशाळेच्या संचालिका डॉ. अपर्णा जयराम यांना डॉ. ललित जैन सन्मान देण्यात आला.

 

बुटीबोरीत कार्यशाळेचे आयोजन

याच परिषदेच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी बुटीबोरी येथील होरिबा कारखान्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. व्हीएपीएमच्या अध्यक्षा डॉ.मनिषा मिश्रा आणि सहअध्यक्ष डॉ. रसिका गडकरी यांनी परिषदेत सहभागी प्रतिनिधींचे स्वागत केले तर सचिव डॉ. कोमल गलानी यांनी आभार मानले. परिषदेदरम्यान आयोजित पेपर आणि पोस्ट स्पर्धांमध्ये विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी भाग घेतला. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी व्हीएपीएमच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.