Home Nagpur नागपूर शहर चे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना राष्ट्रपती पोलीस...

नागपूर शहर चे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर 

56
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

नागपूर ब्युरो: नागपूर शहर पोलीस दलासाठी अभिमानाचा क्षण आहे !कारण नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी व उल्लेखनीय योगदानासाठी “राष्ट्रपती पदक” प्रदान करण्यात आले आहे. हा प्रतिष्ठेचा सन्मान त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचा, नेतृत्वाचा आणि कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी त्यांनी केलेल्या सेवांचा गौरव आहे. राष्ट्रपती पोलीस पदक हे कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि समाजाच्या सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त यांचा हा सन्मान केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण नागपूर पोलीस विभागासाठी अभिमानाचा क्षण आहे.

डॉ. सिंगल यांनी नागपूरमध्ये पोलीस आयुक्त म्हणून फेब्रुवारी 2024 मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये ऑपरेशन थंडर हा अँटी-ड्रग्ज संदर्भातील महत्त्वाचा उपक्रम त्यांनी राबवला आहे. तसेच सायबर जनजागृती, महिला सुरक्षा, वाहतूक नियमन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सामुदायिक धोरणांचा अवलंब केला आहे. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर आधारित SIMBA कार्यक्रमाली नागपूर शहरात वापरून गुन्हेगारी नियंत्रण व नागरी सुरक्षेसाठी उल्लेखनीय सुधारणा केली आहे. गंभीर गुन्ह्यांची यशस्वीरित्या सोडवणूक आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी अतुलनीय योगदान दिले आहे.

डॉ. सिंगल यांनी नागपूर शहरातील विविध महत्त्वाच्या सण-उत्सव, गर्दी व्यवस्थापन व उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे सांभाळली आहे. डॉ. रवींद्र कुमार सिंगल हे 1996 च्या महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी असून, त्यांच्या 28 वर्षांच्या सेवेत त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मूळचे हरियाणाचे असलेले डॉ. सिंगल हे दिल्लीतील इंजिनीअरिंग पदवीधर आहेत. पोलीस सेवेत रुजू होण्यापूर्वी त्यांनी 1992 ते 1994 या कालावधीत गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (GAIL) इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून कार्य केले. पोलीस सेवेत त्यांनी अमरावती, नाशिक ग्रामीण, धुळे जिल्हा, नांदेड जिल्हा, नागपूर रेल्वे, मुंबई रेल्वे आयुक्त, नाशिक शहर पोलीस आयुक्त, औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य कायदा मापन नियंत्रण आणि महाराष्ट्र वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य केले आहे.

डॉ. सिंगल यांनी 2003 मध्ये नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कुंभमेळ्याच्या आयोजनाचे प्रमुखपद सांभाळले होते. यामध्ये त्यांनी ट्रॅफिक व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि नागा साधूंच्या गटांशी समन्वय साधण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकांकडून त्यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले. 2007 मध्ये नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना, डॉ. सिंगल यांनी सहा दिवसांत 15 लाख भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन केले. तसेच भारताचे राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या भेटीची जबाबदारीही यशस्वीरित्या सांभाळली. डॉ. सिंगल यांनी युनायटेड नेशन्स मिशन इन कोसोव्होमध्ये (UNMIK) प्रतिनियुक्तीवर काम केले आहे. या काळात त्यांनी विविध गुन्हे तपासणी विभागांशी समन्वय साधला व गुप्तचर यंत्रणा,NOTO चे KFOR आणि अमेरिकन लष्करासोबत प्रभावीपणे कार्य केले. डॉ. रवींद्र सिंगल हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असून त्यांना फोटोग्राफी, पिस्तूल शूटिंग, मॅरेथॉन धावणे, घोडेस्वारी, सायकलिंग यासारखे छंद आहेत. त्यांनी प्रसिद्ध आयर्न मॅन किताबही मिळवला आहे. उत्कृष्ट लेखक असलेल्या डॉ. सिंगल यांनी मालेगावची यात्रा, पोलिसिंग अ न्यू डायमेन्शन, कुशावर्ताचा कोतवाल आणि डेक्कन क्लिफ हँगर ही पुस्तके लिहिली आहेत.

नागपूरसाठी डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांना” राष्ट्रपती पदक” मिळणे हा फक्त त्यांचा सन्मान नसून, संपूर्ण नागपूर पोलिस दलाचा अभिमान आहे. हा सन्मान नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाच्या एकत्रित प्रयत्नांचे प्रतीक आहे.

विशेष म्हणजे पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांना यापूर्वी सन 2013 रोजी उत्कृष्ट सेवा पदक मिळाले होते त्यावेळेस देखील ते नागपूर येथे कार्यरत होते. त्यांना यापूर्वी सन 2019 रोजी महाराष्ट्र सरकारचा “विशेष सेवा पदक” देखील मिळाले. सन 2020 रोजी “अंतरिक सुरक्षा सेवा पदक ” व सन 2022 रोजी “PETA इंडिया मानवी पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. डॉ. सिंगल यांचे नेतृत्व नागपूर पोलिसांना नागरिकां च्या सेवेसाठी उत्कृष्टतेचा ध्यास घेण्यास नक्कीच प्रेरित करेल.