Home Nagpur #Nagpur | विकसित महाराष्ट्रासाठी संकल्पबद्ध होवून काम करुया : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

#Nagpur | विकसित महाराष्ट्रासाठी संकल्पबद्ध होवून काम करुया : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

40
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

कस्तुरचंद पार्क मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम उत्साहात साजरा

पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्यासह उत्कृष्ट कार्यासाठी विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांचा सत्कार

नागपूर ब्युरो: नागपूर आणि विदर्भात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. रोजगार निर्मिती, उद्योगांचा विकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, महसूल अशा सर्वच क्षेत्रात विकास सुरु असून  देशासह महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी संकल्पबद्ध होवून कार्य करण्याचे आवाहन, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur
कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार श्यामकुमार बर्वे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अपर आयुक्त डॉ. माधवी चवरे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur
महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून स्वतंत्र झालेल्या भारतदेशाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले. संविधानाला आधार ठेवूनच देशाची विविध क्षेत्रात प्रगती होत आहे. प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतदेश तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाकडे अग्रेसर झाला आहे. प्रधानमंत्र्यांनी देशाला वर्ष 2047 पर्यंत विकसित करण्याचा संकल्प केला आहे व या दिशेने कार्य सुरु आहे. पुढच्या दहा वर्षात देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने विविध क्षेत्राचा विकास होत आहे.
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur
महाराष्ट्रातही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याने भारताच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमी फोरममध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यात 15 लाख 70 हजार कोटींची गुंतवणूक आणली. नागपूरसह विदर्भातही मोठी गुंतवणूक आली आहे. नागपुरात रोजगार निर्मितीसाठी ऑटोमोबाईल ईव्ही क्षेत्रात 500 कोटी तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात (लिथियम बॅटरी) 42 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. बुटीबोरी भागात हरीत ऊर्जा क्षेत्रात जवळपास 16 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात स्टील व मेटलमध्ये 10 हजार 319 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur
नागपूर शहरातील मेयो, मेडीकल आणि डागा रुग्णालयांच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासनाने भरघोस निधी दिला आहे. उच्च तंत्रज्ञानाधारीत आरोग्य सुविधा येथे पुरविण्यात येत आहेत. दिवांग्य पार्क, ॲग्रो टुरीझम, मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल, कौशल्य विकास केंद्र उभारण्याच्यादृष्टीने जोमाने कार्य सुरु आहे. पायाभूत सुविधांसह सर्वच क्षेत्रात नेटाने कार्य करुन येत्या 5 वर्षात नागपुरला अंतरराष्ट्रीय शहर बनविण्यासाठी प्रयत् करु, असेही त्यांनी सांगितले.
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur
कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी राज्य सरकार कटीबद्ध असून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. महसूल विभागाच्या योजना सुलभ पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे सांगत पीएम किसान योजनेच्या लाभाचे थेट हस्तांतरण, पीक विमा योजनेसाठी पिकांच्या नुकसानीची अचूक नोंद, पीक कर्ज मिळण्यासाठी शेतकरी ओळखपत्र देणारी ॲग्रीस्टॅक योजना सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ॲग्रीस्टॅक योजनेद्वारे शेतकऱ्यांना रियल टाईममध्ये आवश्यक माहिती व सेवा उपलब्ध होणार आहे. या महत्वाकांक्षी योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले.  महसुलासह अन्य विभागांच्या योजनांचा लाभ सामान्य जनतेला होण्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी,असेही त्यांनी सांगितले. शासन, प्रशासन आणि लोकसहभागातून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी संकल्पबद्ध होऊन काम करुया असेही ते म्हणाले.
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur
तत्पूर्वी, श्री. बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. परिमंडळ ३ नागपुरच्या पोलीस उपायुक्त महक स्वामी यांच्या नेतृत्वात खुल्या जिप्सीमधून श्री. बावनकुळे यांनी परेड निरीक्षण केले. राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४, नागपूर शहर पोलीस, नागपूर ग्रामीण, नागपूर लोहमार्ग पोलीस, महिलांचे गृहरक्षकदल, भोसला सैनिकी शाळा, श्वान पथक, प्रहार समाज जागृती संस्था व प्रहार डिफेन्स अकादमी आदी पथकांनी पथसंचलन केले. विविध विभागांच्या चित्ररथांचे पथसंचलनही यावेळी झाले.
Photo: Umesh Varma Moonlight Dharampeth Nagpur

उत्कृष्ट कार्याचा सन्मान 

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपायुक्त रोशन यादव, वरिष्ठ तुरुंगाधिकारी वामन निमजे आदींसह राष्ट्रपती पदक विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. ध्वजनिधी संकलन, गौरव पुरस्कार, जिल्हा क्रीडा पुरस्कार, जिल्हा युवा पुरस्कार, पोलीस पाटील उल्लेखनीय शौर्य पुरस्कार आदी पुरस्कार प्रदान करण्यात आले.  यावेळी जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांच्या विद्यार्थ्यांनी कवायती व सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती दिली.

‘घर घर संविधान’ चित्ररथास हिरवी झेंडी

भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्री. बावनकुळे यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या ‘घर घर संविधान’ या प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती चित्ररथास हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी हा चित्ररथ संपूर्ण जिल्ह्यांमध्ये फिरवण्यात येणार असल्याची माहिती दिली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक साळीवकर, आकाशवाणीच्या प्रांजली बाविस्कर आणि महेश बागदेव यांनी केले.