नागपूर : एका गर्भवतीला नागपुरातील सरकारी व खासगी रुग्णालयांकडून विविध कारणे सांगून नकार देण्यात आल्यावर रवीनगर येथील डॉ. दंदे हॉस्पिटलने मदतीचा हात दिला. कोविड सेंटर असलेल्या डॉ. दंदे हॉस्पिटलमध्ये गुरुवार (24 सप्टेंबर) या महिलेची निःशुल्क प्रसूती करण्यात आली. डॉ. दंदे हॉस्पिटलचे संचालक डॉ. पिनाक दंदे व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सीमा दंदे यांनी संकटकाळात सामाजिक बांधिलकी जपत एका दाम्पत्याच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे काम केले आहे.
प्रियंका नितीन जाधव नऊ महिन्यांची गर्भवती. तिला एक सात वर्षांची मुलगी आहे. पण दुसरे बाळ पोटात असतानाच कोरोनाचा प्रकोप वाढू लागला. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. शहरातील एका भव्य रुग्णालयात ती गेले नऊ महिने नियमीत उपचार घेत आहे. प्रसूतीची वेळ जवळ येत असताना तिची कोविड चाचणी करण्यात आली आणि त्यात ती पॉझिटीव्ह आढळली. संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने तांत्रिक अडचणी सांगून पुढील प्रक्रियेसाठी असमर्थता व्यक्त केली आणि सरकारी रुग्णालयात दाद मागायला सांगितले.
सरकारी रुग्णालयात गेल्यावर आतापर्यंतच्या सर्व चाचण्यांचे अहवाल व्यवस्थित नाहीत असे सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा चाचण्या कराव्या लागतील असा सल्ला देण्यात आला. शिवाय सरकारी रुग्णालयांमधील परिस्थिती बघूनही तिच्या मनात धडकी भरली. अशा परिस्थितीत हे दाम्पत्य काही खासगी रुग्णालयांमध्ये गेले, पण कुणीही घ्यायला तयार नव्हते. काही ठिकाणी तयारी दाखवली पण अडीच लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला. नितीन जाधव यांनी आपले नातेवाईक, मित्रांकडे ही परिस्थिती मांडली. काहींनी थोडीफार मदत करणे शक्य असल्याचे सांगितले, पण तरीही अडीच लाखापर्यंत पोहोचणे केवळ अशक्य होते. त्यांनी खासगी सावकारांकडेही मदत मागितली, पण शक्य झाले नाही. ही सर्व जुळवाजुळव सुरू असतानाच डॉ. दंदे हॉस्पिटलने दोन कोविड पॉझिटिव्ह गर्भवतीची प्रसूती केल्याची बातमी मित्राकडून त्यांना कळली.
जाधव दाम्पत्य डॉ. सीमा दंदे यांना भेटले. त्यांनी गर्भवतीला तपासले आणि तिच्याशी चर्चा केली. आर्थिक परिस्थिती समजून घेतली व डॉ. पिनाक दंदे यांना भेटायला सांगितले. डॉ. पिनाक दंदे यांनी जाधव यांच्याशी आपुलकीने चर्चा केली व त्यांची आर्थिक बाजू समजून घेत दिलासा दिला. कोरोना काळात हतबल झालेला एक पती आपल्या गर्भवती पत्नीला घेऊन महाराष्ट्राच्या उपराजधानीत वणवण फिरतोय. तिच्या चेहऱ्यावरील चिंतेचे भाव आणि हतबल झालेला पती बघून डॉ. पिनाक दंदे यांनी दोघांनाही विश्वास दिला. डॉ. दंदे फाऊंडेशन व डॉ. दंदे हॉस्पिटलच्या टीमने यावर चर्चा केली आणि प्रसूती निःशुल्क करण्याचा निर्णय घेतला. 23 सप्टेंबरला महिलेला भरती करण्यात आले आणि गुरुवार (24 सप्टेंबर) डॉ. सीमा दंदे यांच्या नेतृत्वातील टीमने तिचे सीझर केले. आई व बाळ दोघेही सुखरुप आहेत.
ही सुद्धा आमची जवाबदारीच
“डॉ. दंदे हॉस्पिटलची सामाजिक बांधिलकी कायम चर्चेत असते. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आमचा सहभागही असतो. पण डॉक्टर म्हणूनही आमची काही कर्तव्य आहेत. ती पार पाडताना उपकाराची किंवा मदतीची भावना आमच्या मनात नसते. आमच्या दृष्टीने आम्ही डॉक्टरच्याच भूमिकेत आहोत”
– डॉ. सीमा व डॉ. पिनाक दंदे
संचालक, डॉ. दंदे हॉस्पिटल
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).