Home हिंदी Nagpur News Bulletine | दीनदयाल रुग्ण सेवेद्वारे आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचे कार्य :...

Nagpur News Bulletine | दीनदयाल रुग्ण सेवेद्वारे आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाचे कार्य : जोशी

734

समाजातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. यासाठी शासकीय रुग्णालयांचा दर्जा वाढविण्यात येत आहे. मात्र अनेकदा अपुऱ्या उपकरणांचा अभाव, आवश्यक साहित्य नसणे यामुळे रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागतो. मोठ्या खाजगी रुग्णालयांमध्ये जाण्याची ऐपत नसल्याने अनेकांना जीवही गमवावा लागतो. ही वेळ कुणावरही येउ नये, प्रत्येकाला वेळेत योग्य उपचार मिळावा. त्यासाठी अडसर ठरणाऱ्या बाबींचे समाधान करण्याकरिता समाजिक दायित्वाच्या भावनेने ‘दीनदयाल रुग्णसेवा प्रकल्प’ सुरू करण्यात आला. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतील या प्रकल्पाद्वारे शासकीय रुग्णालयांना अनेक आवश्यक उपकरणे, वस्तू, साहित्य पुरविण्यात येतात. नागपूर शहरातील विविध खाजगी कंपन्यांच्या ‘सीएसआर’चे सुद्धा यासाठी सहकार्य आहे.

याशिवाय शहरातील प्रत्येक भागात आरोग्य सेवा पोहोचावी, गरजूंना वेळेत उपचार मिळावे. आजाराचे लवकर निदान व्हावे याकरिता ‘चालता-फिरता’ दवाखाना हा सुद्धा महत्वाकांक्षी प्रकल्प महापौर संदीप जोशी यांनी सुरू केला. आज या प्रकल्पाच्या माध्यमातून झोपडपट्टी भागामध्ये नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. शिवाय आवश्यक औषधेही नि:शुल्क देण्यात येत आहे.

उत्तम आरोग्य सेवा मिळविणे हा समाजातील प्रत्येक घटकाचा हक्क आहे. त्यासाठी आपली यंत्रणा कार्यरत आहेच. मात्र या यंत्रणेवरील ताण लक्षात घेता नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळविण्यासाठी आपले छोटेशे सहकार्य मोठी भूमिका बजावू शकते. या हेतूने ‘दीनदयाल रुग्णसेवा प्रकल्प’ सुरू करण्यात आले आहे. दीन-दलितांची, वंचितांची सेवा करीत राहणे, हाच या सर्व प्रकल्पांमागील उद्देश आहे, अशी भावना महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली.


माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जयंती म.न.पा.त संपन्न

देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी लढा देण्या-या भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न प्रियदर्शनी स्व.इंदिरा गांधी यांच्या 103 व्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे “राष्ट्रीय एकात्मता” दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. म.न.पा.सिव्हील कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे व सहाय्यक आयुक्त महेश धामेचा यांनी स्व.इंदिरा गांधींच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन आदरांजली दिली तसेच उपस्थित अधिकारी/कर्मचा-यांना श्री. राम जोशी यांनी “राष्ट्रीय एकात्मतेची शपथ” दिली.

यावेळी जनसंपर्क अधिकारी ‍मनिष सोनी, सामान्य प्रशासन विभागाचे अधिक्षक मदन सुभेदार, सहा. अधिक्षक मनोज कर्णिक, ललित राव, बालकृष्ण पलांदुरे, राजेश वासनिक, जगदीशसिंह बैस, राजेश लोहीतकर, शुभम धकाते, अनित कोल्हे, यांच्यासह अधिकारी/कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.


मनपाच्या 29 शाळा 23 नोव्हेंबर पासून सुरु होणार

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय सोमवार 23 नोव्हेंबर पासुन पुन: सुरु होत आहे. महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी पर्यंतची शाळा / कॉलेज सुरु करण्याचे निर्देश निर्गमित केले होते. तब्बल आठ महिन्यानंतर शाळा सुरु होणार आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. तसेच अति.आयुक्त जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीति मिश्रीकोटकर यांनी दि.12 रोजी झूम मीटिंगच्या माध्यमातून माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांची सभा घेऊन त्यांना शाळा सुरु करण्यासंबंधी आवश्यक निर्देश दिले. मनपाचे 25 माध्यमिक व चार कनिष्ठ महाविद्यालयांचे जवळपास 3754 विद्यार्थ्यांना इंग्रजी,‍ गणित आणि विज्ञान विषय शिकवीले जातील.

राज्य शासनाने दिलेल्या दिशा निर्देशानुसार मनपाच्या शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना आर.टी.पी.सी.आर चाचणी करण्याचे सांगितले आहे. आतापर्यंत 60 टक्के शिक्षकांनी चाचणी केली आहे. उर्वरित शिक्षकांच्या चाचण्या 20 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शाळांकडे उपलब्ध निधीतून थर्मामीटर, थर्मल गन, पल्स आक्सीमीटर, जंतुनाशक साबण इत्यादी खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मनपाचा शाळेमध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची रोज थर्मल स्क्रीनींग केली जाईल तसेच शाळेच्या आवारात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. शाळेत चार पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र जमणार नाही तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या साहित्याची जसे मास्क, पाण्याची बॉटल, शालेय साहित्य याची अदलाबदल करु नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहे.

विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. संशयीत कोविड-19 रुग्ण शाळेत आढळल्यास त्याला इतरांपासून वेगळे ठेवावे व त्वरीत आरोग्य यंत्रणेशी संपर्क करावा. आजारी मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. वर्गखोली तसेच स्टाफ रुम मधील बैठक व्यवस्था शारिरिक अंतराचा नियमानुसार करण्याचे आदेश दिले आहेत. पालकांना सुध्दा विद्यार्थ्यांना स्वत: त्यांच्या वैयक्तीक वाहनाने शाळेत सोडण्याचे सांगितले आहे. स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही तसेच रोज निर्जंतुक करण्यात येतील, असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले.


वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).