नागपूर ब्यूरो : काश्मीरमधील चिनाब नदीच्या खोऱ्यातील डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या सृष्टी सौंदर्याचे सर्वांगसुंदर दर्शन सरहद संस्थेने तयार केलेल्या कॉफीटेबल बुकमध्ये आहे. निर्सगाच्या या अद्भुत देणगीची माहिती यामुळे देशाला होईल, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवार, 7 डिसेंबर ला येथे केले.
गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये विविध विषयांवर काम करणाऱ्या पुणे येथील सरहद्द संस्थेमार्फत चिनाब खोऱ्यातील सृष्टी सौंदर्याचे दर्शन घडविणाऱ्या कॉफी टेबलची निर्मिती करण्यात आली आहे. आज नागपूर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री डॉ. नितिन राऊत, विभागीय आयुक्त संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर -अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागुल, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, वनराईचे गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, संजय सिंगलकर, संदीप देशमुख, अजय पाटील, निलेश खांडेकर, यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कश्मीर खोऱ्यात असणाऱ्या विविध संस्कृतीचे विविध धार्मिक प्रवाहाचे वर्षानुवर्षांचे नाते नजीकच्या काळात बदलल्याचे यावेळी सांगितले. देशाच्या सर्व विचारधारांना घेऊन चालणारा हा ऐतिहासीक प्रदेश असून त्याच्या अंतर्गत सृष्टी सौंदर्याची माहिती देशातील उर्वरित भागात पोहोचविण्यासाठी सरहद्द संस्था करत असलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे सांगितले.
मूळचे जम्मू-काश्मीरचे असणारे विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी यावेळी काश्मीर मधील प्रचलित पर्यटनस्थळांपेक्षा चिनाब खोऱ्यातील सृष्टीसौंदर्य अद्भुत आणि प्रेक्षणीय असल्याचे आवर्जुन सांगितले. हा भाग दुर्गम व प्रसिद्धीपासून दूर असल्याने पर्यटन क्षेत्रात दुर्लक्षित राहिल्याची खंत व्यक्त केली. या पुस्तकाच्या माध्यमातून जगाला या प्रदेशाची सचित्र ओळख प्रभावीपणे होईल, असे त्यांनी नमूद केले.
गिरीश गांधी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, चिनाब व्हॅली, डोडा, रामबन, भद्रेवाह आणि किश्तवार या जम्मू विभागातील जिल्ह्यांनी मिळून चिनाब खोरे बनलेले आहे. प्रसिद्ध चिनाब नदी या भागातून वाहते. येथील निसर्गसौंदर्य अद्भुत असले तरी हा भाग प्रसिद्धीपासून वंचित असल्याने पर्यटकांच्या दुष्टीने दुर्लक्षित होता. या भागातील पर्यटन वाढून त्याच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय बदल व्हावा अशी सरहद संस्थेची इच्छा असल्याने या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात येत आहे. या भागातील केवळ निसर्ग सौंदर्यच नव्हे तर येथील इतिहास, आदी वैशिष्ट्यपूर्ण लोकजीवनही जगासमोर आणण्याचा प्रयत्न या पुस्तकाद्वारे करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).