नागपूर ब्यूरो : नागपूरात 94 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक महिलेची कोट्यवधींनी फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संबंधित ज्येष्ठ नागरिक महिला मुक्ता बोबडे, देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आई आहेत.
नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात आकाशवाणी चौकाजवळ मुक्ता बोबडे यांची वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता आहे. त्यावर बोबडे कुटुंबाने अनेक वर्षांपूर्वी सीजन्स लॉन तयार केले होते. मागील 13 वर्षांपासून सीजन्स लॉनच्या देखरेखीसाठी तापस घोष नावाचा व्यवस्थापक ठेवलं होतं. लॉनमध्ये येणाऱ्या बुकिंग्स घेणे, लॉनची देखरेख करणे, आलेले पैसे लॉन संदर्भात आवश्यक कामासाठी खर्च करणे आणि उर्वरित रक्कम मुक्ता बोबडे यांच्या खात्यात जमा करणे अशी जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली होती.
2016 पासून तापस घोष ने मुक्ता बोबडे यांच्या वयाचा आणि आजारपणाचा गैरफायदा घेत सीजन्स लॉनच्या हिशेबात अफरातफर सुरू केली. विविध खर्चाच्या आणि लॉनच्या देखभाल दुरुस्तीच्या बनावट पावत्या तयार करून लॉनच्या कारभारात घोटाळा केला. जेव्हा मुक्ता बोबडे यांनी 2013 पासून लॉनच्या कारभारामधील हिशेब विचारले तेव्हा तापस घोष याने योग्य माहिती दिली नाही.
त्यामुळे मुक्ता बोबडे यांनी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदविली होती. प्रकरण थेट सरन्यायाधीशांच्या आईच्या फसवणुकीचे असल्याने पोलिसांनी या प्रकरणी विशेष तपास पथक बनवून सखोल चौकशी केली होती. चौकशीत तापस घोषने या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक असलेल्या मुक्ता बोबडे यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी काल रात्री ( मंगळवार, 8 डिसेंबर) सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तापस घोषच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. फसवणुकीची रक्कम अडीच कोटींच्या घरात असून हे पैसे तापस घोष ने कुठे वळते केले आहे याचा तपास पोलीस करत आहेत.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).