परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचे निर्देश
नागपूर ब्यूरो : नागपूर शहरामध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. शहरात नागरिकांना परिवहन सेवा देताना सुरक्षेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे नागरिकांना परिवहन सेवा देताना बसमधील वाहक आणि चालकांनी सुरक्षेच्या सर्व साहित्यांचा वापर करणे अनिवार्य आहेच शिवाय प्रवाशांकडूनही ते करवून घेणे आवश्यक आहे. ‘आपली बस’मधून प्रवास करणा-या प्रत्येक प्रवाशाने मास्क लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे विना मास्क कोणत्याही प्रवाशाला ‘आपली बस’मध्ये प्रवेश देउ नये, असे सक्त निर्देश परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी दिले.
शुक्रवारी (ता.11) ‘आपली बस’संदर्भात विविध विषयांच्या अनुषंगाने परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी बसचे संचालन करणारी कंपनी डिम्ट्स, वाहक पुरविणारी कंपनी युनिटी सर्व्हिमसेस आणि सर्व चेकर्ससोबत चर्चा केली. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, लेखा अधिकारी विनय भारद्वाज, राजस्व निरीक्षक समीर परमार, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, डिम्ट्सचे ऑपरेशन हेड श्री.कावळे, सतीश सदावर्ते, युनिटी सर्व्हिससेसचे राजेश तळेगावकर आदी उपस्थित होते.
यावेळी परिवहन समिती नरेंद्र (बाल्या) बोरकर म्हणाले, कोव्हिड संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. ‘आपली बस’चे वाहक आणि चालक या दोघांनीही मास्क लावणे बंधनकारक असून ते लावल्यास त्यांच्याकडून १०० रूपये दंड वसूल करण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी दिले. याशिवाय ‘आपली बस’चे वाहक, चालक आणि चेकर्स यांनी नियमित गणवेश धारण करणे अत्यावश्यक आहे. संबंधित कंपन्यांनी त्वरीत सर्व वाहक, चालक आणि चेकर्स यांना गणवेशाची परिपूर्ती करावी, असेही निर्देश सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी दिले.
दोषींची सुनावणी पागे व पिपरूडे समितीकडे
‘आपली बस’मध्ये वाहकांकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होउ नये व त्याचा फटका मनपाच्या उत्पन्नावर पडू नये, यासाठी डिम्ट्स ला दिलेल्या निर्देशानुसार चेकर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. या चेकर्सवर गैरप्रकारावर आळा घालण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. एखाद्या बसमध्ये तपासणीअंती वाहक दोषी आढळल्यास चेकर्सकडून सरसकट संबंधित वाहकाची आयडी ब्लॉक केली जाते. ही कारवाई करीत असताना गैरप्रकार रोखणे हा उद्देश असला तरी वाहकावर अन्याय होउ नये, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित दोषी वाहकाची सरसकट आयडी ब्लॉक न करता त्याची केस तयार करण्यात यावी. सदर केसेस डीम्स कंपनीद्वारे परिवहन विभागाकडे वर्ग केली जाईल.
परिवहन समितीद्वारे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे व अरूण पिपरूडे यांची समिती गठीत करण्यात आली आहे., ही समिती संबंधित वाहक व चेकर यांची सुनावणी घेउन संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतील. समितीपुढे दोषी आढळणा-या वाहकाला थेट कामावरूनच काढले जाईल, असा इशाराही परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी दिला आहे. कोव्हिडच्या काळात मनपाचे उत्पन्न अत्यल्प झाले. अशा स्थितीत आज ‘आपली बस’द्वारे उत्पन्न वाढविण्याची जबाबदारी सर्व चेकर्स आणि वाहकांवर आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने प्रामाणिकपणे काम करावे, असे आवाहन सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी यावेळी केले.
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).