शाखा व्यवस्थापकच निघाला मास्टरमाईंड, 5 आरोपींना अटक
वर्धा ब्यूरो : वर्ध्यातील मुथ्थुट फिनकॉर्प फायनान्स दरोड्याचा पोलिसांनी अवघ्या सहा तासात छडा लावला आहे. यवतमाळच्या करळगाव परिसरातून पाच आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे बँकेचा शाखा व्यवस्थापकच या दरोड्याचा मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं आहे. कर्जामुळे ही चोरी झाली असावी असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
99 हजार 120 रुपये रोख, 2 किलो 55 ग्रॅम सोनं, दोन चारचाकी असा एकूण 4 कोटी 75 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यासोबत एक पिस्तूल, 6 मोबाईल फोन इत्यादी साहित्यही ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी दिली.
कुरियर बॉय असल्याचं सांगत केला प्रवेश
मुथ्थुट फिनकॉर्प फायनान्समध्ये काल (17 डिसेंबर) सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास दरोडा पडला. चोरट्याने कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून तीन लाख रुपये रोख, अंदाजे साडे नऊ किलो सोनं लंपास केलं होतं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. दरोडखोराने कुरियर बॉय असल्याचं सांगत आत प्रवेश केला. त्यानंतर बंदूक आणि चाकूचा धाकावर रोख रक्कम आणि सोनं घेतलं आणि कर्मचाऱ्यांना लॉकर रुममध्ये डांबून पोबारा केला. सोबतच एका कर्मचाऱ्याची दुचाकीही पळवली.
अवघ्या सहा तासात छडा लावला
दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या सहा तासात याचा छडा लावला. चोरट्याला बँकेतीलच कोणतरी माहिती दिली असावी या दृष्टीने पोलिसांनी तपास केला. त्यानंतर बँकेचा ब्रान्च मॅनेजर महेश श्रीरंगे हाच या दरोड्याचा मास्टरमाईंड असल्याचं पोलीस तपासात उघड झालं. पोलिसांनी यवतमाळच्या करळगाव परिसरातून चार आरोपींना मुद्देमालासह अटक केली.
अटक केलेल्या आरोपींची नावे
- 1) महेश अजाबराव श्रीरंगे, नागपूर, उमरेड (वय 35 वर्षे) ब्रान्च मॅनेजर
- 2) कुशल सदाराम आगासे, यवतमाळ (वय 32 वर्षे)
- 3) मनीष श्रीरंग घोळवे, यवतमाळ (वय 35 वर्षे)
- 4) जीवन बबनराव गिरडकर (वय 36 वर्षे) यवतमाळ
- 5) कुणाल धर्मपाल शिंदे, यवतमाळ (वय 36 वर्षे)
वाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना? अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).