मुंबई ब्यूरो : आपलं वेगळेपण दाखविण्या साठी चित्रपट अभिनेते नेहमीच धडपडत असतात. याचा प्रत्यय शनिवारी एका कार्यक्रमात आला. मुंबई पोलिसांच्या कार्यक्रमात आलेल्या अभिनेता अक्षय कुमारने आपल्या उजव्या पायावरील टॅटू लोकांना दिसावा यासाठी त्याने पॅन्ट विचित्र पद्धतीने घातली होती. ही बाब मुम्बईकरांच्या लक्षात आली आणि सर्वच म्हणत सुटले, “अक्षय कुमार ! असं वागणं बरं नव्हं”.
शनिवारी संध्याकाळी वरळी इथं मुंबई पोलीस दलाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये वरळी सी फेस या परिसरात पेट्रोलिंग करण्यासाठी मुंबई पोलिसांना सेगवे ही अत्याधुनिक कार्यप्रणालीची स्कूटर प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता अक्षयकुमार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे उपस्थित होते. तर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व पाहुण्यांच्या अगोदरच अक्षय कुमारने हजेरी लावली.
मात्र येताना त्याने परिधान केलेली पॅन्ट विचित्र पद्धतीने घातली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष अक्षयच्या पायांकडे गेलं. अक्षय कुमारच्या उजव्या पायावर एक टॅटू कोरण्यात आलेला आहे. हा टॅटू लोकांना दिसावा किंवा त्याच्याकडे सर्वांचे लक्ष जावं यासाठी अक्षय कुमारने उजव्या पायामध्ये पॅन्ट फोल्ड करून गुडघ्याच्या वरपर्यंत घेतली होती. तर डाव्या पायात पूर्णपणे पॅन्ट व्यवस्थित ठेवली होती. या अशा अवस्थेमध्ये या सरकारी कार्यक्रमांमध्ये अक्षय वावरत होता. कार्यक्रमासाठी आलेल्या बहुतांश मुंबईकरांचं लक्ष अक्षयच्या पायांकडे गेलं. अक्षयच्या पॅन्टची चर्चा लोकांमध्ये रंगली. मुंबई पोलिसांच्या विशेषत: सरकारी कार्यक्रमांमध्ये कसं यावं या संदर्भातलं तारतम्य अक्षयला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली होती.