Home मराठी Nagpur | मनपाचे 54वे महापौरपदी दयाशंकर तिवारी यांची निवड

Nagpur | मनपाचे 54वे महापौरपदी दयाशंकर तिवारी यांची निवड

787

मनीषा धावडे 56 व्या उपमहापौर : प्रत्येकी 107 मत प्राप्त करून विजय

नागपूर ब्यूरो : नागपूर महानगरपालिकेचे 54 वे महापौर म्हणून ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी तर 56 व्या उपमहापौर म्हणून मनीषा धावडे यांची निवड झाली. मंगळवारी (ता.5) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवडणुकीत महापौर पदी प्रभाग 19 ‘ड’चे नगरसेवक दयाशंकर चंद्रशेखर तिवारी व उपमहापौर पदी प्रभाग 23 ‘ब’ च्या नगरसेविका मनीषा आशिष धावडे या भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला.

मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये ऑनलाईन पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुकीचे पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे उपस्थित होते. याशिवाय मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, निगम सचिव डॉ.रंजना लाडे, मतमोजणी अधिकारी म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे, त्यांचे मदतनीस म्हणून प्रफुल्ल फरकासे व मदन सुभेदार यांच्यासह महापौर पदाचे उमेदवार दयाशंकर तिवारी, रमेश पुणेकर, नरेंद्र वालदे, मनोज गावंडे, उपमहापौर पदाच्या उमेदवार मनीषा धावडे, रश्मी धुर्वे, वैशाली नारनवरे, मंगला गवरे उपस्थित होते.

सकाळी 11 वाजता पिठासीन अधिका-यांच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी झोननिहाय मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. मनपाचे नगरसेवक व नगरसेविका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये जुळले होते. निगम सचिवांद्वारे प्रत्येक सदस्याचे नाव पुकारून त्यांचे मत जाणून घेण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सदस्यांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला हात उंचावून मतदान केले.

यामध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार दयाशंकर तिवारी यांना एकूण 107 मते प्राप्त झाली. तर काँग्रेसचे उमेदवार रमेश पुणेकर यांना 27, बहुजन समाज पक्षाचे उमेदवार नरेंद्र वालदे यांना 10 मते मिळाली. महापौर पदाच्या निवडणुकीत किशोर कुमेरिया, आभा पांडे, ‌ऋषिकेश (बंटी) शेळके, गार्गी चोपरा, पुरूषोत्तम हजारे हे 5 सदस्य गैरहजर होते.

उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मनीषा धावडे यांनीही 107 मते प्राप्त केली. तर काँग्रेसच्या उमेदवार रश्मी धुर्वे यांना 26, बसपाच्या उमेदवार वैशाली नारनवरे यांना 10 मते मिळाली. या निवडणुकीमध्ये किशोर कुमेरिया, आभा पांडे, ‌ऋषिकेश (बंटी) शेळके, गार्गी चोपरा, पुरूषोत्तम हजारे, कमलेश चौधरी हे 6 सदस्य गैरहजर होते. पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सर्वाधिक 107 मते प्राप्त झालेले दयाशंकर तिवारी यांची महापौर पदी व मनीषा धावडे यांची उपमहापौर पदी विजयी उमेदवार म्हणून घोषणा केली.

मनोज गावंडे व मंगला गवरे यांचे उमेदवारी अर्ज मागे

महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून अर्ज सादर केलेल्या दोन उमेदवारांनी निवडणुकीतून अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडून महापौर पदासाठी प्रभाग 33 ‘ड’चे नगरसेवक मनोजकुमार धोंडूजी गावंडे यांनी नामनिर्देशन सादर केले होते. तर उपमहापौर पदाकरिता प्रभाग 28 ‘ब’च्या नगरसेविका मंगला प्रशांत गवरे यांनी नामनिर्देशन सादर केले होते. निवडणुकीच्या वेळी दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

मावळत्या महापौरांनी केले अभिनंदन

महापौर व उपमहापौर पदी विजयी झाल्यानंतर दयाशंकर तिवारी व मनीषा धावडे यांचा सत्तापक्ष कार्यालयामध्ये सत्कार करण्यात आला. दोन्ही विजयी उमेदवारांच्या गळ्यात विजयी पुष्पहार घालून मावळते महापौर संदीप जोशी, आमदार गिरीश व्यास, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, मावळत्या उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, यांनी अभिनंदन केले. यानंतर दोन्ही विजयी उमेदवारांनी विधानभवन चौकातील गोंडराजे बख्त बुलंद शाह यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. संविधान चौकामध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण केला. तत्पूर्वी महापौर पदाचे विजयी उमेदवार दयाशंकर तिवारी व उपमहापौर पदाच्या विजयी उमेदवार मनीषा धावडे यांनी म.न.पा.मुख्यालयाचे परिसरात असलेल्या महानगरपालिकेचे प्रथम महापौर बॅरि.शेषराव वानखेडे यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.