Home मराठी Maharashtra | राज्यात बर्ड फ्लू नाही, सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू – सुनील...

Maharashtra | राज्यात बर्ड फ्लू नाही, सर्वेक्षण कार्यक्रम नियमित सुरू – सुनील केदार

635

मुंबई ब्युरो : राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे. राज्यात बर्ड फ्लु सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबविण्यात येत असून पुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशूसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

केदार म्हणाले,पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लु सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांच्या घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. यांची तपासणी पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळा, पुणे या 5 राज्यांसाठी पशुरोग निदानाच्या शिर्षस्थ प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येतात. सन 2020-21 मध्ये या संस्थेने आजतागायत राज्यातील एकूण 1715 विष्ठा नमूने, 1913 रक्तजल नमुने 1549 घशातील द्रवांचे नमुन्यांची तपासणी आरटीपीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली आहे. तपासणीअंती वरील सर्व नमूने बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे.

कोबडयांमध्ये बर्ड फ्लु चा संसर्ग आढळून आलेला नाही

केदार म्हणाले की, स्थलांतरीत होणा-या जंगलीपक्षांमध्ये, कावळयांमध्ये, परसातील कोंबडयांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन करणा-या ठिकाणावर बर्ड फ्लू रोगाचे सर्वेक्षण अधिक प्रखरपणे राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे निर्गमीत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात अद्यापपावेतो वन्य व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये, कावळयांमध्ये अथवा कोबडयांमध्ये बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही अथवा या रोगामुळे मृत्यू झाल्याचे देखील दिसून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुट पालक. अंडी व मांस खाणाऱ्या मांसाहारी नागरिकांनी अकारण घाबरण्याची परिस्थिती नाही.तसेच स्थलांतरीत होणा-या जंगली पक्षांमध्ये, कावळयांमध्ये, परसातील कोंबडयांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन होणाऱ्या ठिकाणावर असाधारण स्वरुपाचा मृत्यू आढळून आल्यास त्वरीत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन श्री.केदार यांनी केले.

चार राज्यात बर्ड फ्लु

बर्ड फ्लु रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळ राज्यामधील स्थलांतरीत पक्षामध्ये आढळून आला आहे. हिमाचल प्रदेश या राज्यातील कांगडा जिल्ह्यातील पांग धरणाच्या परिसरात सायबेरीया आणि मंगोलीया या देशामधून स्थलांतरीत झालेल्या डोक्यावर दोन पट्या असणाऱ्या बदकांमध्ये मृत्यू आढळून आले आहेत. निशाद (नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ हायसिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस. भोपाळ) या राष्ट्रीय संस्थेने मृत्यूसाठी बर्ड फ्लु रोगाचा H5N1 स्ट्रेन कारणीभूत असल्याचे निदान केले आहे, हिमाचल प्रदेश राज्यातील वन विभागांद्वारे पानथळ जमीनीशेजारच्या भागामध्ये या रोगाच्या सर्व्हेक्षणाचा मोठया प्रमाणात कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.