Home Health Covid Vaccine | पुण्याहून वॅक्सिन रवाना; देशभरात लस पोहोचवणार

Covid Vaccine | पुण्याहून वॅक्सिन रवाना; देशभरात लस पोहोचवणार

636

पुणे ब्यूरो : आजपासून सीरम इन्स्टिट्यूने आपल्या कोविड-19 कोरोना वॅक्सिन कोविशील्डचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीची पहिली बॅच रवाना झाली आहे. सीरम इन्स्टिट्युटमधून कोरोना वॅक्सिनचे तीन ट्रक पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. एअरपोर्टहून वॅक्सिनचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. देशात प्रत्यक्ष लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक रवाना झाले आहेत. पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटपासून या वाहनाला एअरपोर्टपर्यंत सुरक्षा पुरवली. त्याआधी पोलिसांकडून लस घेऊन जाणाऱ्या या गाडीची पुजाही करण्यात आली. ही लस पुणे एअरपोर्टवरुन कार्गो विमानांद्वारे देशभरात पाठवली जाणार आहे. आज अशाप्रकारची आणखी तीन वाहनं लसीचे डोस घेऊन पुणे एअरपोर्टला रवाना होणार आहेत. काल केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवणं सुरु करण्यात आलं आहे.

पुणे झोन-5 च्या डीसीपी नम्रता पाटील यांनी सांगितलं की, “कोरोना वॅक्सिनची पहिली बॅच पोलिसांच्या सुरक्षेत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून रवाना झाली आहे.” पुणे एअरपोर्टहून वॅक्सिनच्या एअर ट्रान्सपोर्टची जबाबदारी सांभाळणारी कंपनी एसबी लॉजिस्टिकचे एमडी संदीप भोसले यांनी सांगितलं की, एकूण आठ फ्लाइट्सच्या माध्यमातून कोविशील्ड लस पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशातील 13 ठिकाणी पोहोचवली जाणार आहे. पहिली तुकडी दिल्ली विमानतळासाठी रवाना करण्यात आली आहे.