बुलढाण्यातील सिंदखेडराजामध्ये जन्मोत्सव कार्यक्रमांना सुरुवात
बुलढाणा ब्यूरो : राजमाता जिजाऊंचा 422 वा जन्मोत्सव आज साजरा करण्यात येत आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा इथे जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव राजवाड्यात आज सकाळपासूनच जन्मोत्सव कार्यक्रम सुरु झाल आहे.
आज सूर्योदयापूर्वी इथल्या ऐतिहासिक राजवाड्यात पुरातत्व विभागाच्या वतीने शासकीय महापूजा बुलढाण्याचे पालक मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते संपन्न झाली. सिंदखेडराजा इथल्या जिजाऊं सृष्टीमध्ये मराठा सेवा संघाकडून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या कार्यक्रमांसाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी दिली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दुपारी होणाऱ्या एका छोटेखानी कार्यक्रमात मराठा सेवा संघाचा सर्वोच्च मराठा विश्वभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. तर जन्मस्थळी मोजक्याच लोकांना मानवंदना देण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिंदखेडराजा शहर आणि परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.