Home Maharashtra प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असल्यानं पासपोर्ट प्रकरण उकरुन काढलं

प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असल्यानं पासपोर्ट प्रकरण उकरुन काढलं

685

नवी दिल्ली ब्यूरो : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी आपलं नाव चर्चेत असल्यामुळे आपलं पासपोर्ट प्रकरण टायमिंग साधत काढण्यात आलं, असा गंभीर आरोप मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काल अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीनंतर विजय वडेट्टीवार म्हणाले, पक्ष जी जबाबदारी देईल ती स्विकारण्याची माझी तयारी आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, “पासपोर्ट प्रकरण उकरुन काढणं म्हणजे, किरकोळ आहे. त्यात एवढं काही नाही. राजकारणात बदनामीच षडयंत्र करणं सुरुच असतं. त्यामध्ये एवढा मोठा विषय नाही. पण टायमिंग साधला गेलाय. शेवटी राजकारण आहे, राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपण कोणावर आरोप करण्यापेक्षा आपल्या हातून काय चुका झाल्यात त्यावर चर्चा करुन चुका होऊ नयेत म्हणून पुढे जाणं हा राजकारणातील गुणधर्म आहे.”

विजय वडेट्टीवार बोलताना म्हणाले की, “मराठा आरक्षणासंदर्भात अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली. एकूण मराठा आरक्षणासंदर्भात 25 जानेवारीला जी सुनावणी पार पडणार आहे. कदाचित ती अंतिम सुनावणी असले, त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी उपसमितीचे अध्यक्ष म्हणून अशोक चव्हाण शरद पवारांना भेटले होते.”

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावतीजवळ सरकारची शासकीय एमआयडीसीची 3 हजार एकर जमीन आहे. ती पूर्वी एका पॉवर प्रोजेक्टसाठी देण्यात आली होती. पण तो प्रोजेक्ट उभा न राहिल्यामुळे ती जागा आता एमआयडीसीच्या मालकीची झाली आहे. अशा परिस्थिती तिथे एक मोठा प्रोजेक्ट यावा, जागा उपलब्ध आहे, रेल्वे ट्रॅक आहे, वीज आहे, यासंदर्भात विनंती करण्यासाठी मी आणि अशोक चव्हाण शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलो होतो. त्यामागे कोणताही राजकीय हेतू नव्हता. एकूण विकासाच्या संदर्भात ती चर्चा होती.”