Home Health कोव्हिशिल्ड लस मध्यरात्री नागपुरात दाखल, विभागातील 6 जिल्ह्यात वितरण

कोव्हिशिल्ड लस मध्यरात्री नागपुरात दाखल, विभागातील 6 जिल्ह्यात वितरण

664

नागपूर ब्यूरो : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं संयुक्तरित्या बनवलेली कोव्हिशिल्ड लस नागपुरात मध्यरात्री दाखल झाली. मध्यरात्री 2.45 वाजता व्हॅक्सिन घेऊन आलेली व्हॅन उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालय इथं पोहोचली. त्यानंतर पहाटे 4.14 वाजेपर्यंत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये या लसीचं वितरण करण्यात आलं आहे. या सहा जिल्ह्यांसाठी लसीचे एकूण 1 लाख 14 हजार डोस पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली आहे.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोरोना लस घेऊन निघालेली व्हॅन तब्बल 18 तासांचा प्रवास करुन नागपुरात मध्यरात्री पोहोचली. या दरम्यान व्हॅक्सिन व्हॅनमध्ये तापमान गरजेनुसार नियंत्रित करण्यात आलं होतं. ही लस नागपुरात पोहोचल्यानंतर आता सुरुवातीला नागपूरमधील विभागीय आरोग्य कार्यालयातील कोल्ड स्टोरेजमध्येही ठेवण्यात आली आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून यापूर्वीच कोल्ड स्टोरेजची निर्मिती करण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाने लसीकरणाची जय्यत तयारी केली आहे. नागपूर शहरासाठी महाल विभागात साठवणूक केद्र तयार करण्यात आले आहे. भंडारा 9500, चंद्रपूर 20000, गडचिरोली 12000, गोंदिया 10000, नागपूर 42000 व वर्धा 20500 अशा एकूण 1 लाख 14 हजार कुपी पाठवण्यात आल्या. केंद्र भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी 3, चंद्रपूर 6, गडचिरोली 4, नागपूर 12 आणि वर्धा जिल्ह्यात 6 लसीकरण केंद्रांवर लस टोचण्यात येईल.

सीरमसाठी भावनिक, तर देशासाठी ऐतिहासिक क्षण

कोव्हिशिल्ड लसीची पहिली मालवाहतूक देशातील विविध ठिकाणी पाठवण्यात येत आहे. हा सीरम इनस्टिट्यूटच्या संपूर्ण टीमसाठी हा एक भावनिक क्षण आहे, अशी पोस्ट सीरम इनस्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी लिहिली आहे. विशेष म्हणजे या पोस्टसोबत अदर पुनावाला यांनी सीरम इनस्टिट्यूटच्या संपूर्ण टीमचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच दुसऱ्या एका फोटोत स्वत: अदर पुनावाला हे कोरोना लस ठेवण्यात आलेल्या ट्रकमध्ये बसलेले आहेत.

लस टोचल्यानंतर 14 दिवसांनी परिणाम

कोरोना लस टोचल्यानंतर किती दिवसांनी शरीरात रोगप्रतिकार क्षमता बनेल याबाबत केंद्र सरकारने माहिती दिली आहे. लसीच्या दुसऱ्या डोजनंतर चौदा दिवसांनी शरीरात चांगल्या प्रकारची रोगप्रतिकार क्षमता बनू शकेल. पहिला डोज दिल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोज दिला जाईल. त्यानंतर 14 दिवसांनी चांगली रोगप्रतिकार क्षमता बनेल, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर लस घेतल्यानंतरही दक्षता पाळण्याचा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे.