– पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश
- जिल्ह्यात बारा केंद्रांवर आज लसीकरण
• आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक करणार लसीकरण
• ग्रामीण भागातील सात तर शहरातील पाच केंद्रांवर सुविधा
नागपूर ब्यूरो : कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहीमेंतर्गत आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना शनिवार, दिनांक 16 जानेवारी, रोजी पाचपावली येथील महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्रात कोव्हॅक्सीन डोस देऊन आरंभ होणार आहे. लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रावर आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी उपस्थित रहावे अशा सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या आहेत.
पाचपावली येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहीमेचा आरंभ होणार आहे. या मोहीमेंसदर्भात पालकमंत्री डॉ. राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनिल फुलारी, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे डॉ. अजय केवलीया उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोव्हॅक्सीनचे 42 हजार डोस प्राप्त झाले असून यामध्ये ग्रामीण भागासाठी 17 हजार 600 तर शहरासाठी 24 हजार 400 तसेच कामठी कॅन्टोनमेंटसाठी 500 डोसेसचा समावेश आहे. आरोग्य विभागांअर्तगत येणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आदींची नोंदणी केली असून त्यानुसार प्रत्येक केंद्रांवर शंभर व्यक्तींना डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बाराही केंद्रांवर लसीकरणाची संपूर्ण व्यवस्था झाली असून, प्रत्येक केंद्रांवर पाच वैद्यकीय कर्मचारी असलेले पथक लसीकरण मोहीमेत सहभागी होणार असल्याची माहिती डॉ. राऊत यांनी दिली.
नागपूर शहरात पाच केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून यामध्ये डागा महिला रुग्णालय, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय तसेच पाचपावली येथील महापालिकेच्या वैद्यकीय केंद्राचा समावेश आहे. कोविशिल्डचा पहिला डोस दिल्यानंतर अर्धातास या केंद्रावरच थांबवून वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिॲक्शन झाल्यास तात्काळ उपाययोजना करण्यात येणार असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
ग्रामीण भागात सावनेर, काटोल, हिंगणा, उमरेड, रामटेक, कामठी, तसेच गोंडखैरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रावर नोंदणी झालेल्या शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठीची तयारी पूर्ण झाली असून, प्रत्येक केंद्रावर कोव्हॅक्सीन ठेवण्यासाठी शीतकरण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. लसीकरण झाल्यानंतरही नागरिकांना सामाजिक अंतर पाळणे, मास्क घालणे तसेच साबनाने स्वच्छ हात धुणे बंधनकारक असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.
नागपूर विभागात जिल्हानिहाय कोव्हॅक्सीनची लस पोहचली असून, निश्चित केलेल्या केंद्रांवर लसीकरणासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. लसीकरण मोहीमेंमध्ये नोंदणी केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.