Home मराठी मनोवेधक सांस्कृतिक कार्यक्रमांसह 51 व्या इफ्फीचा गोव्यात शानदार शुभारंभ

मनोवेधक सांस्कृतिक कार्यक्रमांसह 51 व्या इफ्फीचा गोव्यात शानदार शुभारंभ

718

पणजी ब्यूरो : चित्रपट रसिक आणि समीक्षक दरवर्षी ज्याची आतुरतेने वाट बघत असतात, असा बहुप्रतीक्षित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- इफ्फीचा आज पणजीत शुभारंभ झाला. इफ्फीचे हे 51 वे वर्ष असून, चित्रपटांच्या मनोरंजनाची रेलचेल असलेल्या या महोत्सवाची सुरुवात, चित्रपटसृष्टीतील नामवंतांच्या उपस्थितीत मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. गोव्यातील पणजी इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडीयमवर आज जगभरातील चित्रपट कलावंत, निर्माते आणि चोखंदळ रसिकांच्या मांदियाळीत या महोत्सवाचा नाद, पुन्हा एकदा दुमदुमला.

आशियातील सर्वात जुन्या महोत्सवांपैकी एक आणि भारतातील सर्वात मोठ्या अशा या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालक सुप्रसिध्द अभिनेत्री तिस्का चोप्रा यांनी केले. चित्रपट निर्माते प्रियदर्शन नायर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते सुदीप यांनी सोहळ्याची शोभा वाढवली. त्याशिवाय, इतर अनेक सिने कलाकारांनी देखील सोहळ्याला खास उपस्थिती लावत रसिकांचा आनंद द्विगुणीत केला. भारतीय पॅनोरामाच्या ज्युरीचे अध्यक्ष प्रियदर्शन नायर आणि आंतरराष्ट्रीय सिनेमा ज्युरीचे अध्यक्ष पाबलो सीझर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

‘भारत ही एक अत्यंत विलोभनीय, आश्चर्यकारक भूमी असून इथे आपण कोणतीही स्वप्ने बघू शकतो, कारण भारतात काहीही शक्य आहे.”अशी प्रतीक्रिया,आंतरराष्ट्रीय सिनेमा ज्युरीचे अध्यक्ष पाबलो सीझर यांनी व्हिडीओ संदेशातून व्यक्त केली.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची या उद्घाटन सोहळ्याला विशेष उपस्थिती होती. त्याशिवाय, माहिती आणि प्रसारण विभागाच्या अतिरिक्त सचिव, नीरजा शेखर, इफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांच्यासह भारत सरकारचे अनेक अधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या सोहळ्याला बांगलादेशचे महावाणिज्य दूत मोहम्मद इम्रानही उपस्थित होते. यंदाच्या इफ्फीमध्ये बांगलादेशची फोकस कंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे. या महोत्सवात, बांगलादेशातील निवडक दर्जेदार दहा चित्रपट दाखवले जाणार आहेत. अशा आव्हानात्मक काळातही इफ्फीचे आयोजन करण्याचा सरकारचा निर्णय, भारताची आव्हाने पार करण्याची धाडसी वृत्ती आणि कटीबद्धता दर्शवणारा तसेच कला आणि संस्कृतीविषयी असलेली आत्मीयता प्रकट करणारा आहे, अशा भावना बांगलादेशचे महावाणिज्य दूत मोहम्मद इम्रान यांनी यावेळी व्यक्त केल्या.