- राज्यातील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्या.
- निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले आहे.
- आज या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आहे.
राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. या निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले. मतमोजणीला साधारण 10 वाजेपासून सुरुवात होईल. सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे. दरम्यान मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरुन काही मनाई आदेश आणि महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मतमोजणीसाठी तालुक्याच्या ठिकाणी प्रशासन सज्ज झालं आहे.
राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 162 ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. विविध कारणांमुळे 15 तारखेला प्रत्यक्षात 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात 22 जानेवारी 2021 रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांत 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होईल.
मतमोजणीच्या ठिकाणी या गोष्टींना मनाई
मतमोजणीच्या संपूर्ण परिसरात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी वगळता इतर कोणत्याही व्यक्तींना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोबत तंबाखूजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर, ज्वालाग्राही पदार्थ अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तू मतमोजणीच्या ठिकाणी घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात निवडणूक संबंधित अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे दोन अधिकृत प्रतिनिधी आणि पासधारक व्यक्ती यांच्या शिवाय कोणालाही प्रवेश करण्यास परवानगी नसणार आहे.
मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या
ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. एकूण- 12,711.
ग्रापं निवडणूक एक दृष्टिक्षेप
• निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
• प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
• एकूण प्रभाग- 46,921
• एकूण जागा- 1,25,709
• प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
• अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
• वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
• मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
• बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
• अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880