नवी दिल्ली ब्यूरो : महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याची विश्वसनीय माहिती आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून काँग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु होती. त्यात नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार हे उघड आहे. नाना पटोले यांच्या रुपाने काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष हा विदर्भातून असेल. पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते.
प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांचीही नावे चर्चेत होती. मात्र काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांच्या पुनरागमनाची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राजीव सातव यांना दिल्लीतून सोडण्यास हायकमांडने नकार दिला आहे. विजय वडेट्टीवार यांच्याबाबतही काँग्रेसमधला एक वरिष्ठ नेत्याचा गट सक्रिय होता. मात्र या दोघांऐवजी नाना पटोले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नाना पटोले यांच्या निवडीमुळे विधानसभा अध्यक्ष बदलाचा ही प्रश्न आहे. त्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतही चर्चा केल्याचं समजत आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून कोणाची निवड होणार याची ही चर्चा सुरु होईल.
बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री पद, प्रदेशाध्यक्षपद आणि काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते पद अशी तीन पदे होती. त्यामुळे त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला अवघं दीड वर्ष झालं तरीही ही बदलाची प्रक्रिया सुरू झाली होती. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात विधानसभेत काँग्रेसला 44 हा सन्मानजनक आकडा गाठता आला होता. मात्र तीन पक्षांच्या सरकारमध्ये काँग्रेस कमजोर पडत असल्याची टीकाही त्यांच्या नेतृत्वावर सुरु झाली होती. त्यामुळे आता नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस राज्यात आपलं अस्तित्व दाखवण्यात किती यशस्वी होते हे पाहावे लागेल.