विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश
ग्रामविकास आणि पर्यटन विभागाने संयुक्त बैठक घेण्याची सूचना
नागपूर/मुंबई ब्यूरो : राज्यस्तरीय तीर्थक्षेत्र ब वर्ग प्राप्त असलेल्या नागपूरजवळील परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम, पावडदौना या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ निर्मीतीच्या दृष्टीने युध्द पातळीवर गती द्यावी. त्यादृष्टीने पर्यटन आणि ग्रामविकास विभागाने तातडीने संयुक्त बैठक घेउून बृहत आराखडा अंमलात आणण्यासाठी कार्यवाही करावी अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.
यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि पर्यटन मंत्री घआदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले या तीर्थक्षेत्राला छत्तीसगड, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश अशा सीमा भागातील हजारो भाविक आणि पर्यटक भेटी देत असतात. मात्र सुविधा अपुऱ्या असल्यामुळे आणि रस्ते सुस्थितीत नसल्यामुळे भाविकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या तीर्थक्षेत्र विकासाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास शासनाच्या दृष्टीने मोठे कार्य घडेल. हे तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ म्हणूनही नामांकित आहे. अशावेळी तीर्थस्थळासह पर्यटनस्थळ निर्मीतीच्या भावनेने या प्रस्तावाला शासनाने मान्यता देणे गरजेचे आहेत. त्यासाठी ग्रामविकास आणि पर्यटन विभागाने संयुक्त बैठक घेऊन हा प्रस्ताव युध्द पातळीवर मार्गी लावण्याच्या सूचना श्री पटोले यांनी यावेळी दिल्यात.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, या तीर्थक्षेत्राच्या विकासाला शासन नक्कीच प्राधान्य देईल. तीर्थस्थळासह पर्यटनस्थळ निर्मिती करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. रस्त्यांची कामे ग्रामविकास विभागामर्फत करण्यासाठी ग्रामविकास आणि पर्यटन विभागाची संयुक्त बैठक घेण्यात येईल.
भाविकांची संख्या वाढल्यामुळे सुविधा कमी पडत आहेत. त्यासाठी शासनाने वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा, त्या माध्यमातून भाविकांसाठी पायाभूत सुविधा, रस्ते, विश्रामगृह, मनोरंजनासाठी लाईटींग शो अशा सुविधा उभारता येतील. त्यासाठी अंदाजे 44 कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो प्रस्ताव शासनाने मान्य करण्याची मागणी परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष राजू मदनकर यांनी यावेळी केली.
या बैठकीला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप सचिव राजेंद्र जवंजाड, विधानमंडळ सचिवालयाचे उप सचिव विलास आठवले आदि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.