Home Maharashtra Nagpur । केंद्र शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी

Nagpur । केंद्र शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी

700
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडून प्रभावी अंमलबजावणीसाठी समूह गटांची स्थापना
जिल्हा विकास व समन्वय तथा नियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक

नागपूर ब्युरो : जिल्हा विकास समन्वय तथा सनियंत्रण समितीअंतर्गत जिल्ह्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या किमान 40 योजना कार्यान्वित आहे. या योजनांचे समूह गट तयार करा. या गटामार्फत योजनांची सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी नागपूर जिल्ह्यात झाली पाहिजे, असे निर्देश केंद्रीय रस्ते परिवहन, राजमार्ग, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे दिले.

जिल्हा विकास समन्वय तथा सनियंत्रण समितीची शुक्रवार ला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे बैठक झाली. या बैठकीत ते म्हणाले, केंद्रातील कोणत्याही स्तरावरील पाठपुरावा करण्यासाठी मी तत्पर आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरील सर्व योजनांचे समूहगट करा व या गटामार्फत जिल्ह्यातील प्रस्तावांचा पाठपुरावा करा, नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व केंद्रीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे,असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी या समूह गटाचे नेतृत्व खासदार डॉ. विकास महात्मे करतील अशी घोषणाही त्यांनी केली.

सकाळी 11 वाजता जिल्हा विकास समन्वय तथा सनियंत्रण समितीच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीला खासदार विकास महात्मे, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार सर्वश्री नागो गाणार, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, कृष्णा खोपडे, समीर मेघे, आशीष जैस्वाल, विकास कुंभारे, टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त शीतल तेली- उगले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे यांच्यासह विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, स्वच्छ भारत अभियान शहरी, स्वच्छ भारत अभियान ग्रामीण, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आदींसह शिक्षण, आरोग्य, कौशल्य, विकास, कृषी, पणन महिला व बालकल्याण आदी 40 योजनांचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्ह्यातील पांदण रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे, या रस्त्याचे ई-टॅगिंग करण्यात यावे, नगरपालिकांच्या सहभागाबाबत बैठक घ्यावी, दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये आडकाठी आणणाऱ्या बँकांवर कारवाई करण्यात यावी, विशेष सहायता योजना वेळेत कार्यान्वित व्हाव्यात, गरीब, गरजू, जेष्ठ नागरिकांना मदतीसाठी सरकारी कार्यालयाच्या बँकेच्या फेऱ्या मारायला लागू नये, तसेच गरिबी रेषेखालील लाभार्थी (बीपीएल ) ठरवताना काही निकष व अटी तपासून पाहण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी संयुक्तरीत्या निवेदन द्यावे, प्रधानमंत्री आवास योजनेतील अडचणीचा पाढा न वाचता प्रत्येक पात्र लाभार्थ्याला आर्थिक मदत दिली गेली पाहिजे, घरे तत्काळ मिळाली पाहिजे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या बैठकीमध्ये टाऊन प्लॅनिंग विभागाच्यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. ही बाब प्रशासनाने गंभीरतेने घेऊन या विभागाच्या कामकाजाला नियंत्रित करण्याचे निर्देशही गडकरी यांनी आज दिले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा नियंत्रण समिती सदस्य श्रीपाद बोरीकर, डॉ. संजय उगेमुगे, भैय्यासाहेब बिघाने, सेवक उईके, डॉ. पुजाताई धांडे यांचे स्वागत करण्यात आले. सभेचे संचालन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.