-वंजारीनगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे स्टेशन रस्त्याचे उद्घाटन
-ब्रॉडगेज मेट्रोसाठी तरुण उद्योजकांनी पुढे यावे
-विद्यापीठ ग्रंथालय ते आरटीओ, कस्तुरचंद पार्क ते रेल्वे स्टेशन उड्डाणपूल होणार
नागपूर ब्युरो : नागपूर शहराचा चौफेर विकास होत आहे. आगामी काळात शहराचे संपूर्ण चित्रच बदललेले दिसेल. रस्ते, उड्डाणपूल, पाणी, वीज, गरिबांना घरे, शिक्षण, आरोग्य, अशी सर्वच कामे सुरु आहेत. काही पूर्ण झाली आहेत. शहराच्या सर्व भागाचा विकास करण्याचा प्रयत्न आहे. ही सर्व कामे जनतेपर्यंत जावी. कारण जनतेने दिलेल्या संधीमुळे आपण ही कामे करू शकतो, असे सांगताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या ब्रॉडगेज मेट्रोसाठी नागपूर विदर्भातील तरुण उद्योजकांनी पुढे यावे. मी त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे, असे आश्वासन दिले.
वर्धा रोड ते उमरेड रोडला जोडणार्या वंजारी नगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे स्टेशन या रस्त्याचे उद्घाटन आज ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. वंजारीनगर उड्डाणपुलाजवळ या रस्त्याचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला महापौर दयाशंकर तिवारी, आ. मोहन मते, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धवड उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना ना.गडकरी यांनी सांगितले की, अत्यंत अडचणीतून मार्ग काढीत आणि प्रचंड पाठपुरावा केल्यानंतर हा रस्ता झाला आहे. तत्कालीन माजी आ. स्व. अशोक वाडीभस्मे, आ. मोहन मते, आ. सुधाकर कोहळे यांनी या रस्त्यासाठी प्रचंड पाठपुरावा केला आहे. अजनी येथे आता 800 हेक्टर जागेत सर्वात सुंदर स्टेशन उभारण्यात येत असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- अमेरिकन आर्किटेक्टने या स्टेशनचे डिझाईन केले आहे. सर्व मार्गांनी जाणार्या बस या स्टेशनला जोडल्या जाणार आहेत. जागा रेल्वेची आहे. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचार्यांना आजच्या पेक्षा चांगले क्वार्टर आणि शाळा बांधून देण्यात येईल. तसेच नागपूर उमरेड 4 पदरी रस्ता मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या वाढीव कामासाठी 55 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचेही ते म्हणाले.
रिंगरोड ही शहराची हार्टलाईन असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- रिंगरोडवर झाडे लावली जात आहेत. मी स्वत: त्याकडे लक्ष देत आहे. शहरावर आणि शहराच्या मातीवर माझे माझ्या घरासारखे प्रेम आहे. ब्रॉडगेज मेट्रोने चंद्रपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, छिंदवाडा, बैतूल, रामटेक अशी सर्व गावे जोडली जाणार आहेत. 30 मेट्रो आपण घेत आहोत. 36 कोटी रुपयांची एक मेट्रो असून ती घेण्यासाठी एमएसएमईतून मी कर्ज देण्यास तयार आहे. नागपूर व विदर्भातील तरुण उद्योजक तरुणांनी पुढे यावे. मी त्यांना सर्व प्रकारे सहकार्य करण्यास तयार आहे. संपूर्ण मेट्रो वातानुकुलित राहील. इकॉनॉमी व बिझनेस क्लास यात राहतील. रेस्टॉरंट राहील, टीव्ही राहील आणि एसटीच्या बरोबरीने तिकीट राहील. नागपूर भोवतालची सर्व गावे यामुळे विकसित होतील, असेही ते म्हणाले.
केंद्र शासनाच्या सीआरएफ निधीतून 18हजार कोटींची कामे जिल्ह्यासह शहरात झाली आहेत. आता विद्यापीठ ग्रंथालय ते आरटीओ ऑफिस या दरम्यान एक उड्डाणपूल होणार आहे. त्याचे टेंडर निघाले आहे. केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत शहरात 20 प्रकल्प सुमारे 1800 कोटींचे सुरु आहेत. शहराचा चौफेर विकास होत आहे. शिक्षण क्षेत्र, आरोग्य क्षेत्रातही नामांकित संस्था नागपुरात आल्या आणि सुरु झाल्या आहेत. पण याचे श्रेय जनतेला आहे. कारण जनतेमुळे मी हा विकास करू शकलो. तसेच कस्तुरचंद पार्क के रेल्वे स्टेशन हा एक उड्डाणपूल होणार आहे. आगामी काळात नागपूर बदललेले दिसेल. देशातील सर्वात सुंदर शहर म्हणून नागपूरचा गौरव होईल, असेही ते म्हणाले.
आज उद्घाटन झालेला वंजारी नगर ते अजनी रेल्वे स्टेशन हा रस्ता 524 मी लांबीचा असून 30 मीटर रुंद आहे. 4 पदरी रस्ता असून 1.5 मी लांबीचे फुटपाथ आहेत. दोन्ही बाजूंना 1.60 मीटर रुंदीचे सायकल ट्रॅकही देण्यात आले आहेत. या रस्त्यादरम्यान वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होणार असून वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. या रस्त्याखाली 30 मीटर लांबीचे 2 अंडरपास देण्यात आले आहेत. रस्त्याचे दोन्ही बाजूला 2 मीटर उंचीचे ‘साऊंड बॅरिअर’ लावण्यात आले असून त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना रहदारीचा त्रास होणार नाही.