नामकरणावरून होत असलेला वाद दुर्दैवी असल्याची टीका
नागपूर ब्युरो : नागपूर येथे बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते 26 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजता होत आहे. या उद्यानाचे नामकरण करण्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उद्यानाचे नाव गोंडवाना उद्यान करावे, अशी आदिवासी बांधवांची मागणी होती, असे चित्र निर्माण करून दिशाभूल करण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला जात आहे. मात्र सध्या या उद्यानात केवळ 20 टक्केच भागाचे उद्घाटन होत आहे. या उद्यानात आणखी सफारी, नाईट सफारी, जैवविविधता उद्यान हे उपक्रम आहेत. भविष्यात या उद्यानामध्ये आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरा, जीवनमान याबाबत सर्वसमावेशक असे ‘गोंडवाना थीम पार्क’ करण्याचे नियोजन आम्ही मा.मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीने करणार आहोत, अशी भूमिका राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी या उद्यानाच्या नामकरणावरून होत असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना मांडली.
उद्यानास बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्यावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे दुर्दैवी आहे असे वनमंत्री राठोड म्हणाले. बाळासाहेब ठाकरे हे स्वत: पर्यावरणप्रेमी व वन्यजीव प्रेमी होते. एवढेच नव्हेतर सर्व ठाकरे कुटुंबीय हे पर्यावरणप्रेमी व आदवासी समाजाचे हितच पाहणारे आहेत. मागील 10 वर्षांपासून हे पार्क बनवण्याच्या घोषणा होत गेल्या. मात्र प्रत्यक्षात कार्यवाही केली नाही, ही वस्तूस्थिती आहे. 10 वर्षांपासूनच्या सर्व प्रशासकीय नस्ती तपासाव्यात गोंडवाना नाव देण्याचा कुठेही प्रस्ताव शासनाकडे नव्हता, असेही राठोड यांनी म्हटले आहे. खरेच हा प्रस्ताव होता तर मग तेव्हाच नाव का दिले नाही, याचे उत्तर विरोधकांना देता येणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला प्रत्यक्ष विरोध करण्याची हिंमत नसल्याने आदिवासी समाजाचा वापर करून अप्रत्यक्ष विरोध करू नका, असे आवाहनही वनमंत्री राठोड यांनी केले आहे.
गोरेवाडा उद्यान हे जवळपास दोन हजार हेक्टरवर पसरलेले भारतातील सर्वात मोठे प्राणी उद्यान असणार आहे. आता फक्त त्यातील भारतीय प्राणी सफारीचे उद्घाटन होत आहे. एकूण क्षेत्रफळाच्या हा केवळ 20 टक्के भाग आहे. भविष्यात येथे गोंडवाना थीम पार्क उभारण्याचा मानस आहे. याकरिता झारखंड, छत्तीसगडमधील आदिवासी थीम पार्कचा अभ्यास करून त्यापेक्षा सरस आणि सुसज्य असे गोंडवाना पार्क या उद्यानाअंतर्गत निर्माण करण्यात येईल, असे वनमंत्री राठोड यांनी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणी उद्यान हे नागपूर आणि विदर्भवासीयांची शान ठरणार आहे, याची पूर्ण खात्री आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री महोदयांनी स्वत: येण्याचे मान्य केले होते. कोकणातील निसर्गसंपदा वाचविण्यासाठी, रिफायनरीचा विरोध, संजय गांधी उद्यानातील अतिक्रमणे थांबविण्याचा विषय, अवनी वाघिणीला मारण्याचा विरोध करण्याचा विषय आणि आरे कॉलनीतील झाडे तोडण्याचा प्रश्न हे सर्व विषय ठाकरे कुटुंबियांनी पर्यावरण, जंगल, वन्यजीव वाचविण्यासाठी पुढाकाराने केलेले आहेत. त्यांच्या नावाचा विरोध करणे हे दुर्दैवी आहे, असे वनमंत्री म्हणाले. आदिवासी बांधवांसाठी अनेक गोष्टी करण्याचा ठाम निश्चय आघाडी सरकारचा आहे. त्यामुळे अपप्रचार व खोट्या माहितीच्या आधारावर होणाऱ्या विरोधाला आपण साथ देऊ नये, असे आवाहन संजय राठोड यांनी केले आहे.
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय उद्यानाच्या उद्घाटन कार्यक्रमाकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित केलेले आहे. त्याचबरोबर स्थानिक आमदार व खासदार यांना देखील आमंत्रित केलेले आहे. कोविड – 19 च्या पार्श्वभूमीवर केवळ 50 जणांना निमंत्रित करण्याचे बंधन ठेवण्यात आले आहे. कोविड अनुषंगाने शासनाच्या सर्व दिशा निर्देशांचे पालन करून हा कार्यक्रम होणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.