Home Maharashtra आत्मनिर्भर | कवठ्यातील महिलांनी उभारला राज्यातील पहिला सोलर पॅनल निर्मिती उद्योग

आत्मनिर्भर | कवठ्यातील महिलांनी उभारला राज्यातील पहिला सोलर पॅनल निर्मिती उद्योग

767

महिला बचत गटांचे उद्योग म्हणजे केवळ कुरड्या, पापड्या, मसाले, लोणचे, शेळी पालन, कुक्कुटपालन, सामूहिक शेती,आदीपर्यँत सीमित असल्याचे दिसून येते. मात्र वर्धा जिल्ह्यातील महिला बचत गटांनी याला छेद देत ज्या उत्पादनात मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी आहे अशा सोलर पॅनल निर्मीतीचा उद्योग उभारून महिलांच्या बळकटीकरणाला एक नवा आयाम दिला आहे.


देशात साधारणत: मोठ्या कंपन्यांमार्फत सोलर पॅनलचे उत्पादन केले जाते. मात्र वर्धा जिल्ह्यातील फारसे शिक्षण न झालेल्या बचत गटाच्या महिलांनी सोलर पॅनल निर्मितीसारख्या तांत्रिक कामामध्ये प्राविण्य मिळवून उद्योगात भरारी घेणे ही अचंबित करणारी पण सत्यात उतरलेली घटना आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटामार्फत सोलर पॅनल निर्मीतीचा उद्योग उभारणे हे महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील दुसरे उदाहरण आहे.

महिला बचत गटांच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी वर्धा जिल्हा अग्रेसर राहिला आहे. येथील बचत गटांच्या महिला उमेद अभियानांतर्गत इतर जिल्ह्यात जाऊन महिलांना बचत गटाचे कार्य कसे असते याबाबत प्रशिक्षणही देतात. त्याचबरोबर बँक सखी, पशुसखी, कृषी सखी अशा विविध क्षेत्रात काम करून महिला स्वतःच्या उपजीविकेसोबतच गावातील लोकांना मार्गदर्शन करण्याचे कामही करीत आहेत. देवळी तालुक्यातील कवठा झोपडी गावात उमेद अभियानांतर्गत बचत गट व ग्रामसंघ तयार करण्यात आले असून महिलांच्या एकत्रीकरणातूनच उद्योगाची संकल्पना पुढे आली. या गावात मागासवर्गीय महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

गावातील तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय संस्था म्हणजे स्वतः महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बनवलेली एक महिला औद्योगिक को-ऑपरेटिव्ह संस्था आहे. तेजस्वी सोलर एनर्जीची सुरुवात मार्च 2018 मध्ये झाली. तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय महिला औद्योगिक प्रकल्पाची नोंदणी को-आपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत करण्यात आली असून त्यामध्ये 214 महिला समभागधारक आहेत. त्यापैकी 200 महिला ह्या मागासवर्गीय आहेत.

आय. आय. टी. मुंबई ही संस्था अपांरपारिक ऊर्जा मंत्रालयासोबत अपारंपरिक ऊर्जेवर काम करते. ‘शाश्वत ऊर्जा इको सिस्टीम स्थानिकांकडून स्थानिकांसाठी’ या संकल्पनेवर आधारित त्यांचे काम आहे. स्थानिकांमार्फत निर्मिती केल्यामुळे सोलर पॅनलची किंमत कमी करण्यासोबतच स्थानिकांच्या कौशल्यात भर पडून स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करणे आणि रोजगार निर्मिती होवून स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ करणे हा त्यांचा उद्देश आहे. राजस्थान येथील डुंगरपूर येथे प्रायोगिक स्तरावर त्यांनी सोलर निर्मितीचा प्रकल्प उभारला. ग्रामीण महिला तांत्रिक पद्धतीचे काम करू शकतात हे लक्षात आल्यानंतर त्यांनी वर्धा जिल्ह्यात असा प्रकल्प उभारण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी यांना विचारणा केली असे आय. आय. टी. मुंबईचे प्रकल्प व्यवस्थापक अमित देशमुख यांनी सांगितले.

सुरुवातीला या प्रकल्पातील 12 महिलांना दुर्गा सोलर एनर्जी (डुंगरपुर, राजस्थान) येथे सोलर पॅनल निर्मितीचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर वर्षभर अमित देशमुख यांनी गावात राहून महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले. यात कंपनी चालविण्यासाठी लागणारे कौशल्य, माहिती तंत्रज्ञान,आर्थिक व्यवस्थापन, अकाऊंट, टॅली, कच्चा माल ऑनलाईन मागविणे, उत्पादित माल विक्रीसाठीचे कौशल्य आदी बाबींचा समावेश होता. खरेतर एक वर्षात आम्ही इंजिनिअर महिला घडवून त्यांना उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व बाबींसाठी परिपूर्ण केले आणि हे अतिशय कठीण काम होते असे देशमुख म्हणतात.

तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या प्रयत्नातून समाजकल्याण विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेतून कावठा झोपडी येथील ग्रामसंघासाठी 2 कोटी 62 लक्ष कोटीचे भागभांडवल तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय संस्थेला मंजूर केले आहे. त्यापैकी 1 कोटी 83 लक्ष रूपये उपलब्ध करून दिले आहे . यातून फॅक्टरी शेड बांधकाम, शेड उभारणे मशिन खरेदी व उभारणी आदी बाबी करण्यात आल्या. यासाठी महिलांना प्रकल्प अहवाल तयार करून त्याला जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेणे, को-ऑपरेटिव्ह संस्था म्हणून नोंदणी तसेच वस्तू व सेवा कर नोंदणी इत्यादी कामे करण्यासाठी वर्धा उमेद अभियानयामार्फत महिलांना सहकार्य करण्यात आले.

आज कवठा (झोपडी) या गावात कंपनीच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून पॅनल तयार करण्याचे काम सुरू आहे. तसेच सोलर पॅनल, सोलर स्ट्रीट लाईट व सोलर होम लाईट इत्यादी बनविण्याचे कामही महिला करीत आहेत. या कामात 40 महिला अगदी निष्णात झाल्या आहेत. काही महिला अकाऊंट, काही महिला मार्केटिंग मध्ये प्राविण्य प्राप्त झाल्या आहेत. महिलांद्वारा संचालित या कंपनीला नुकतेच जिल्हा परिषदेमार्फत 40 लाख रूपयांचे ग्रामीण भागात स्ट्रीट लाईटचा पुरवठा करण्याचे कामही मिळाले आहे.

महिला चांगल्या व्यवस्थापक होऊ शकतात असे म्हटले जाते. मात्र कवठा सारख्या ग्रामीण भागातील अगदी जुजबी शिक्षण घेतलेल्या महिलांनी सोलर पॅनल सारख्या तांत्रिक वस्तूच्या उत्पादनाचा उद्योग उभारणे आणि त्यात स्वत: प्राविण्य मिळवणे म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे. प्रकल्पामुळे महिलांना निश्चितच शाश्वत रोजगार होऊन त्यांचे भविष्य उज्वल होईल यात शंका नाही.

उद्यमशील होण्याचा प्रयत्न

आम्ही गावातील महिला, बचत गट चळवळीच्या मार्फत उद्यमशील होण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमच्या कवठा (झोपडी) या गावात बहुसंख्य महिला मागासवर्गीय समाजाच्या असून समाजकल्याण विभागामार्फत ‘नाविन्यपूर्ण योजनेतून महिलांकरिता आमच्या गावात सोलर पॅनल निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. त्यामार्फत महिलांना सोलर पॅनल तयार करण्याचे प्रशिक्षण मिळाले असून त्याकरिता आमच्या गावातच कंपनी उभारण्यात आलेली आहे त्यामार्फत सोलर पॅनल, सोलर स्ट्रीट लाईट, होम लाईट तयार होत आहेत.”

-संगीता वानखेडे, (संचालक, तेजस्वी सोलर एनर्जी, कवठा झोपडी ता.देवळी,जि.वर्धा)

महिलांना शाश्वत रोजगार मिळून देणे हा उदेश

“वर्धा जिल्हा हा नेहमीच बचतगटांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाकरिता अग्रेसर राहिलेला आहे. महिलांना शाश्वत रोजगार मिळून देणे हा उदेश आहे कावठा येथील महिलांच्या या उद्योगामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उत्पादनात वाढ होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.”

-डॉ.सचिन ओंबासे, (मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.वर्धा)