Home Maharashtra कोरोना नियंत्रणात नागरिकांची उत्तम साथ, पालकमंत्र्यांकडून कौतुक

कोरोना नियंत्रणात नागरिकांची उत्तम साथ, पालकमंत्र्यांकडून कौतुक

751
  • भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 71 वा वर्धापन दिन उत्साहात
  • लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन

नागपूर ब्युरो : नागपूर जिल्ह्यात साधारण एक लाख तीस हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली. मे ते ऑगस्ट याकाळात भीषण परिस्थिती होती. मात्र या कालावधीत न डगमगता नागपूर जिल्ह्यात व विभागात कोरोना नियंत्रण करण्यासाठी प्रशासन व आरोग्य यंत्रणेने उत्तम काम केल्याची पावती पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिली. प्रशासनाला नागपूरकर जनतेने देखील उत्तम साथ दिली. प्रारंभीच्या हतबलतेपासून तर आताच्या लसीकरणांपर्यंतचा हा कोविड लढा जनता, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती व प्रशासनाच्या सामूहिक दृढतेचा विजय असल्याचे, प्रतिपादन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम आज कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, विशेष पोलिस महानिरिक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यावेळी उपस्थित होते.

कोरोना महामारीत विभागीय आयुक्त कार्यालयाने केलेल्या शिस्तबद्ध नियोजनामुळे जिल्ह्यात व विभागात कोरोना नियंत्रणात आला. कोरोना काळात बेडची उपलब्धता, ऑक्सिजन, रेमिडीसीवर औषध व कोविड केंद्रांची उपलब्धता यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, आरोग्य उपसंचालक व अन्नधान्य वितरण, गृह विभाग या विभागांनी उत्कृष्ट समन्वयांसह मोलाची कामगिरी केली. ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ या मोहिमेमुळे घरोघरी आरोग्य यंत्रणा पोहोचली. शासनाने एकूण 169 कोटीची मदत कोरोना उपाययोजनासाठी केली. डॉक्टर, पोलीस, मदतनीस,सफाई कामगार, शासकीय कर्मचारी यासगळया स्तरातील घटकांनी केलेली मदत हा माणुसकीचा गहिवर असल्याचे पालकमंत्र्यांनी कृतज्ञतेने सांगीतले.

स्वयंसेवी संस्थाच्या कामाचा ठळकपणे त्यांनी उल्लेख केला. विभागात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आलेली पूरपरिस्थिती व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना 64 कोटीची मदत केल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पर्यटनाला विकसित करण्यासाठी बुद्धिस्ट थीम पार्क, चिचोली येथील म्युझियम, उर्जा पार्क, बुद्धिस्ट सर्कीट या प्रकल्पांवर काम सुरू असल्याचे ते म्हणाले. जिल्हयात 2 हजार 344 कृषी पंपाना जोडणी देण्यात आली आहे. निसर्ग वादळाने कोकणात केलेल्या नुकसानात उर्जा विभागाने उत्तम काम केले. उर्जा विभागाच्या विविध योजनांना गतिमान करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यात 43 हजार खातेधारक शेतकऱ्यांना 370 कोटी रुपयाची कर्जमाफीचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले. नोकर भरतीसाठी शासन प्रयत्नरत आहे. युवाशास्त्रज्ञ श्रीनभ अग्रवाल यांची राष्ट्रीय बालपुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. पद्मश्री मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ तसेच साहित्यिक नामदेव काबंळे यांचाही गौरवपर उल्लेख पालकमंत्र्यांनी केला.

कोविडवर लस आली असली तरी सर्वानी अजुनही मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे व शारिरीक अंतर पाळणे या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्राथम्य देण्यात येत आहे. व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. आगामी काळ आरोग्यदायी ठरण्याच्या शुभेच्छांसह पालकमंत्र्यांनी भाषणाचा समारोप केला.