वॉलेंटरी प्रॉविडेंट फंड (VPF) च्या मदतीने तुम्ही आता टॅक्स बचतीचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला चांगला सेवानिवृत्ती फंडही मिळेल. काय आहेत या गुंतवणुकीचे फायदे…
नवी दिल्ली ब्यूरो : पगारदार लोकांची एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंडाला (EPF) नेहमीच पसंती असते. कारण यातील गुंतवणूक करमुक्त असते. प्राप्तिकर कायद्यातील कलम 80 सी (Income Tax Act 80 c) अंतर्गत कर वजावटीचा फायदा यासाठी घेता येतो. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील ठराविक रक्कम कापून ती दरमहा ईपीएफ खात्यात भरते. जितकी कर्मचाऱ्याची रक्कम असेल तितकीच रक्कम कंपनी घालते आणि ती सर्व रक्कम दरमहा कर्मचाऱ्याच्या ईपीएफ खात्यात जमा केली जाते. ईपीएफमधील गुंतवणुकीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करायची असेल तर व्हीपीएफ (VPF) अर्थात व्हॉलंटरी प्रॉव्हिडंट फंडाचा पर्याय उपलब्ध आहे.
व्हीपीएफच्या माध्यमातून तुम्ही ज्यादा रक्कम ईपीएफमध्ये गुंतवू शकता. कंपनी तुमच्या बेसिक पगाराच्या 12 टक्के रक्कम कापून ती ईपीएफ खात्यात भरते. त्यात तेवढीच रक्कम घालते. यातील 8.33 टक्के हिस्सा एम्प्लॉयीज पेन्शन योजनेत जातो. हा हिस्सा बेसिक पगार 15000 रुपये किंवा दरमहा 1250 रुपयांपर्यंत मर्यादित असतो. एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंडस अँड मिसलेनियस प्रोव्हिजन कायद्याअंतर्गत हे अत्यावश्यक करण्यात आले आहे.
ईपीएफच्या दरानंच मिळते व्याज
दरमहा योगदान आणि व्याजाचा चांगला दर यामुळं निवृत्ती पश्चात आयुष्यासाठी एक चांगली रक्कम या योजेनेव्दारे निर्माण होते. ईपीएफ खात्यात बेसिक पगाराच्या 12 टक्क्यापेक्षा अधिक रक्कम जमा करता येते. त्याला अतिरिक्त स्वेच्छा योगदान मानलं जाईल. या अधिकच्या गुंतवणुकीवर दर वर्षी ईपीएफवर मिळणाऱ्या व्याज दरानेच व्याज मिळेल. ईपीएफ प्रमाणेच यालाही कर सवलत मिळेल. ही रक्कम काढण्यासाठी ईपीएफचेच नियम लागू आहेत.
व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम करमुक्त
व्हीपीएफमधील गुंतवणूक ही प्राप्तिकराच्या कलम 80 सी नुसार करमुक्त आहेच,पण यावर मिळणारे व्याजदेखील कर मुक्त आहे. मुदतपूर्तीनंतर मिळणारी सर्व रक्कमही करमुक्त असते. व्हीपीएफ हे ईपीएफचे एक्स्टेंशन आहे. ईपीएफचा व्याजदर इतर योजनांपेक्षा अधिक असतो, तसंच केंद्रसरकराची योजना असल्यानं ती सुरक्षितही असते. हेच लाभ व्हीपीएफलाही मिळतात.
व्हीपीएफमुळे निवृत्तीपश्चात निधीत वाढ
चक्रवाढ व्याजामुळे या गुंतवणुकीत चांगली वाढ होते. उदाहरणार्थ, समजा तुमचा बेसिक पगार 50 हजार रुपये आहे. याच्या 12 टक्के म्हणजे 6 हजार रुपये दरमहा तुमच्या ईपीएफसाठी जातात. तुम्ही निवृत्त होण्यासाठी 20 वर्षांचा कालवधी आहे, असे गृहीत धरू. 8.5 टक्के व्याजदरानं तुमच्या ईपीएफ़ खात्यात 67.4 लाख रुपये जमा होतील. त्याशिवाय व्हीपीएफमध्ये बेसिक पगाराच्या 4 टक्के रक्कम गुंतवली तर तुमच्याकडे एकूण निधी 79.94 लाख रुपये जमा होईल.
व्हीपीएफ मध्ये गुंतवणूक सुरू करा
कोणीही कर्मचारी कंपनीच्या मदतीनं व्हीपीएफमध्ये गुंतवणूक करू शकतो. अनेक कंपन्या यासाठी ऑनलाइन सुविधाही देतात. यासाठी केवायसी करण्याची जरूरी नाही. व्हीपीएफमध्ये आपण कधीही गुंतवणूक सुरू करू शकतो आणि बंद करू शकतो. तसंच गुंतवणुकीची रक्कमही आपल्या सोयीनुसार कमी जास्त करू शकतो. काही कंपन्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच ही सुविधा देतात. तुमची गुंतवणूक प्राप्तिकराच्या 80 सी अंतर्गत वार्षिक दीड लाख मर्यादेपर्यंत जात नाही, तोपर्यंत तुम्ही व्हीपीएफमध्ये गुंतवणूक करू शकता.
गुंतवणूक फायद्याची
कोणत्याही कर्मचाऱ्यानं ईपीएफ आणि व्हीपीएफमधील रक्कम निवृत्तीनंतरच काढणं योग्य असतं. अगदीच अडचण आल्यास आपण यातील काही रक्कम काढू शकता. घर खरेदी, गंभीर आजार, अपघात, शिक्षण, लग्न इत्यादी कारणासाठी ही रक्कम काढता येते. शक्यतो मध्येच काढावे लागणार नाही, अशा नियोजनानेच रक्कम व्हीपीएफमध्ये गुंतवावी.