Home मराठी महाराष्ट्रातले काँग्रेसचे सारेच मंत्री दिल्लीत, हायकमांडने तातडीने बोलावलं

महाराष्ट्रातले काँग्रेसचे सारेच मंत्री दिल्लीत, हायकमांडने तातडीने बोलावलं

624

नवी दिल्ली ब्युरो : महाराष्ट्र काँग्रेसमधील सगळ्या मंत्र्यांना आज दिल्लीमध्ये हायकमांडने बोलावलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापुढे हे सगळे मंत्री हजर होणार आहेत. या बैठकीला राहुल गांधीही उपस्थित राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एचके पाटील यांनी राज्यातल्या काँग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांना दिल्लीत बोलावलं आहे. सकाळी 11 वाजता 10 जनपथ येथे ही बैठक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोण मंत्री आहेत उपस्थित?

काँग्रेसच्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड यांच्यासह इतर मंत्री उपस्थित राहणार आहेत.

बैठकीचं कारण काय?

दिल्ली हायकमांडने काँग्रेस मंत्र्यांना अचानक दिल्लीला बोलावल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीचं कारण अजून गुलदस्त्यात असलं, तरी प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत ही बैठक असू शकते, असे म्हटले जात आहे.

बाळासाहेब थोरात यांच्याकडे सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद, महसूल मंत्री पद आणि विधीमंडळात काँग्रेस नेतेपद अशा तीन जबाबदाऱ्या आहेत. यातल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्याबाबत पक्षात हालचाली सुरू आहेत. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्यासाठी नाना पटोले दिल्लीमध्येही गेले होते.