अमरावतीत यशोमती ठाकूर यांच्याहस्ते शुभारंभ
अमरावती ब्युरो : देशात आणि राज्यात आज राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिवस साजरा करण्यात येतोय. त्या निमित्ताने बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अमरावतीत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते राज्यात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीमेच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राज्यातील सर्व जिल्ह्यात त्या-त्या पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिओचे डोस देऊन लसीकरणाच्या अभियानाची सुरुवात केली जात आहे.
आज राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेद्वारे शून्य ते पाच या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस दिला जाणार आहे. आज सकाळी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात पोलिओ डोस देऊन सुरुवात झाली. अमरावती जिल्ह्यात 1 लाख 72 हजार 430 बालकांचे लसीकरण होणार आहे.
मोहिमेत बुथ ॲक्टिविटीद्वारे ग्रामीण भागात 1 लाख 35 हजार 352 आणि नागरी भागात 37 हजार 78 अशा एकूण 1 लाख 72 हजार 430 बालकांचे लसीकरण होणार आहे. ग्रामीण भागात 1 हजार 763 आणि नागरी भागात 200 असे 1963 बुथ असतील. त्यासाठी जिल्ह्यात 4 हजार 830 स्वयंसेवकांचे मनुष्यबळ असणार आहे. महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला वास्तव्यास असलेली घरे, धाबे, शेतातील लाभार्थी, पूल व इमारतीच्या बांधावर असलेल्या मजुरांची बालके, भटक्या लोकांची बालके, याशिवाय बाजाराच्या दिवशी येणारे बालके या सर्वांचे लसीकरण व्हावे, यासाठी मोबाईल पथकांनी सर्वदूर पोहोचून मोहिम यशस्वी करावी, असे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.