Home National Ratan Tata । “मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा”

Ratan Tata । “मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहिम थांबवा”

673

मुंबई ब्युरो : टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे त्यांच्या दातृत्वासाठी प्रसिद्ध आहेत. कोरोना संकटाच्या काळात त्यांनी दिड हजार कोटीची मदत केली. टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आपुलकी आहे, ती त्यांच्या या देशप्रेम आणि दानशूरपणामुळेच. त्यामुळेच सोशल मीडियावर काल रतन टाटा यांना भारतरत्न देण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती. #BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग देखील काल ट्रेंड सुरू झाला होता. सोशल मीडियावरील मागणीनंतर रतन टाटा यांनी ट्वीट करून मला भारतरत्न देण्याची मोहिम थांबवा अशी विनंती केली आहे.

मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी सर्वप्रथम रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. त्यासाठी बिंद्रा यांनी ट्विटरवर #BharatRatnaForRatanTata ही मोहिम सुरू केली. या मोहिमेत लोकांना सहभागी होण्याचे आवाहन देखील केले. या नंतर रतन टाटा यांनी सकाळी ट्वीट केले आणि म्हणाले, “मला भारतरत्न मिळावा यासाठी सोशल मीडियावर तुम्ही दाखवलेल्या भावनांचा मी आदर करतो. परंतु माझी एक विनंती आहे की, ही मोहिम थांबवावी. मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि देशाच्या प्रगतीसाठी मी माझे योगदान कायम देत राहील”

आजारी कर्मचाऱ्याला भेटायला रतन टाटा पुण्यात

टाटा कंपनीत काम करणारा एक कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून आजाराशी झुंजत आहे. ही बातमी टाटा यांच्या कानावर गेली आणि टाटा मुंबई ते पुणे प्रवास करीत कर्मचाऱ्याच्या घरी पोहचले. विशेष म्हणजे ही भेट अत्यंत गोपनीय होती. ना त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक होते, ना कोणते माध्यम प्रतिनिधी. सोशल मीडियावरही यासंदर्भात काहीच माहिती नाही. यातूनच टाटा यांचा मोठेपणा दिसून येतो. आपला उद्योगसमूह वाढण्यासाठी झटलेल्या कर्मचाऱ्यांविषयी त्यांची आपुलकी यातून दिसत आहे.

लॉकडाऊन काळात कर्मचारी कपातीवर रतन टाटा नाराज

कोरोनामुळे लॉकडाऊन आणि बऱ्याच गोष्टी बंद झाल्या होत्या. या काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. पगार कपात करत आहेत. यावर टाटा ट्रस्टचे चेअरमन तथा उद्योगपती रतन टाटा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कठीण काळात कंपन्यांवर कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. संकटाच्या काळात आपण आपल्या कर्मचार्‍यांशी असे वागता, हीच तुमची नैतिकता आहे का? असा सवालही टाटा यांनी उपस्थित केला. ही तिच लोकं आहेत, ज्यांनी तुमच्यासाठी काम केलंय, तुमच्यासाठी कारकीर्द देणाऱ्या या लोकांना तुम्ही आज उघड्यावर सोडून देत आहात, ही तुमच्या नितीमत्तेची व्याख्या आहे का? असं रतन टाटा यांनी म्हटलं होतं.