मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांचे निर्देश
नागपूर ब्यूरो: नागपूरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन: वाढत आहे. कोव्हिड – 19 बाधित रुग्णांची संख्या सतत वाढल्यामुळे यावर नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना आखण्याबाबत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी गुरुवारी (11 फेब्रुवारी) ला वरिष्ठ अधिका-यांची, वैद्यकीय अधिका-यांची तसेच झोनल वैद्यकीय अधिका-यांची बैठक घेवून कोरोना बाधितांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याचे निर्देश दिले.
बैठकीत मनपा आयुक्तांनी सांगितले की, सध्या एक्टीव कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2500 पर्यंत झाली आहे. दररोज 200 ते 300 बाधित होत आहे. यासाठी पुन: एकदा कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांचे संपर्कात आलेले नागरिकांची कोरोनाची चाचणी करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थीतीत कोरोना रुग्ण संख्या कमी झाली पाहिजे.
मनपा आयुक्तांनी उपद्रव शोध पथकांच्या माध्यमातून नागरिकांना सामाजिक अंतराचे पालन करणे, फेस मास्कचा वापर न करणा-यांवर कारवाई करणे तथा हँड सॅनीटाइजरचा उपयोग करण्याचे आवाहन करण्याचे निर्देश दिले. सोबतच त्यांनी कोरोना चाचणीची संख्या वाढविण्याचे ही आदेश दिले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याबाबत व टेस्टींग कठोरतेने राबविण्याबाबत त्यांनी सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी व आरआरटी चमूला निर्देशीत केले.
राधाकृष्णन बी यांनी सांगितले की, घरातील घर काम करणा-या महिला, दूध, भाजी विक्रेता, जेवण तयार करणारे, वाचमन, दूकानदारांची ज्यांचा कामानिमित्त असंख्य लोकांशी संपर्क येतो अश्या सर्वांची वेळोवेळी कोरोनाची चाचणी होणे गरजेचे आहे. ज्या नागरिकांची रॅपिड एंटीजेन टेस्ट जर निगेटिव्ह आली परंतु त्यांना जर लक्षणे असतील तर त्यांची आर.टी.पी.सी.आर चाचणी त्याच केन्द्रावर करण्यात यावी.
मनपा आयुक्तांनी सांगितले की, असे लक्षात आले आहे की खासगी रुग्णालयामध्ये भरती असलेल्या रुग्णांची प्रकृती जास्त बिघडली तर त्याला मेयो रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये पाठविले जाते. खाजगी रुग्णालयांनी तसे न करता कोरोना रुग्णांची स्वत:च्या रुग्णालयात काळजी करायला पाहिजे आणि त्याचे चांगले उपचार करुन त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले पाहिजे.
मनपा आयुक्तांनी नागरिकांना सावधगिरीचा सल्ला देतांना सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव अजुनही वाढत आहे. कोरोना विरुध्दच्या लढाईत स्वत:चे योध्दा बना. घराबाहेर पडतांना मास्क वापरा, सामाजिक अंतराचे पालन करा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवा. शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्याची जबाबदारी प्रशासन आणि नागरिक दोघांची आहे. ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडू देऊ नका त्यांची काळजी घ्या.
पोलिस आयुक्तांशी चर्चा
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत दूरध्वनी वरुन चर्चा केली आणि त्यांना मास्कचा वापर न करणारे, सामाजिक अंतराचे पालन न करणा-या नागरिकांविरुध्द कारवाई करण्याचे निवेदन केले. त्यांनी सांगितले की मिशन बिगीन अगेन लागू झाल्यानंतर नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे कमी केले आहे, त्यामुळे कोरोना बाधीतांची संख्या झपाटयाने वाढत चालली आहे. पोलीस आयुक्तांनी देखील याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले. बैठकीत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, डॉ. नरेन्द्र बहिरवार, डॉ. टिकेश बिसेन इत्यादी उपस्थित होते.