Home Maharashtra महाराष्ट्र ही क्रांतीची भूमी याच भूमीतून पुन्हा क्रांती करून नवा इतिहास घडवा...

महाराष्ट्र ही क्रांतीची भूमी याच भूमीतून पुन्हा क्रांती करून नवा इतिहास घडवा : एच. के. पाटील

643
  • सत्तेसाठी ढोंग करणारे, सोंग करणारे नरेंद्र मोदी हे ‘ढोंगीजीवी’ : नाना पटोले
  • नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसला सोनियाचे दिवस येतील: बाळासाहेब थोरात
  • ऑगस्ट क्रांती मैदानावरून महाराष्ट्र काँग्रेसचा ‘मोदी सरकार चले जाव’चा नारा

मुंबई ब्युरो : नाना पटोले यांची नेत्यांवरची निष्ठा, शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता अशी प्रतिमा आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवलेला असून ते या विश्वासला खरे उतरतील. केंद्रात जनविरोधी, राष्ट्रविरोधी, शेतकरी विरोधी मोदी सरकार असून सहा वर्षात देशातील राजकीय, सामाजिक घडी विस्कटलेली आहे. मोदींच्या राज्यात शेतकऱ्यांवर अत्याचार होत असून भांडवलदारांसाठी काम केले जात आहे. या सरकारला खूर्चीवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही असे सांगून महाराष्ट्र देशाला दिशा दाखवणारे राज्य आहे. या राज्याने इतिहास घडलेला आहे. याच तेजपाल हॉलने देशात क्रांतीकारी इतिहास घडवला आहे. आज पुन्हा मोदी चले जाव चा नारा देऊन महाराष्ट्र पुन्हा इतिहास घडवेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी व्यक्त केला..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रसचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांचा पदग्रहण सोहळा मुंबईच्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात पार पडला त्यावेळी पाटील बोलत होते. यावेळी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नवनियुक्त कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भव्य कार्यक्रमात पदभार स्वीकारला.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, पंडित नेहरूपासून डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारनी देशात मोठे प्रकल्प उभे केले, संस्था उभा केल्या, विकासाची गंगा आणली. परंतु काँग्रेस सरकारने उभे केलेले एअर इंडिया, भेल, विमा कंपन्या, रेल्वे हे सर्व मोदींनी आता विकायला काढले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कोकण रेल्वेही विकायला काढली आहे. देश विकण्यासाठी मोदींना जनतेने सत्ता दिलेली नव्हती. आता मोदी सरकारला यापुढे महाराष्ट्रातील एकही सरकारी मालमत्ता विकू देणार नाही, असा इशारा नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

नाना पटोले पुढे म्हणाले की, मागील सहा वर्षात मोदी सरकारने मनमानीपद्धतीने कारभार चालवलेला आहे. शेतकरी अडचणीत आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अत्याचार केला जात आहे. पण नरेंद्र मोदी यांना त्याचे दुःख नाही. म्हणून या अन्यायी, अत्याचारी मोदी, भाजपा, आरएसएस सरकारला हुसकावून लावण्याचे काम करायचे आहे. नरेंद्र मोदी यांनी आंदोलक शेतकऱ्यांचा आंदोलनजीवी म्हणून अपमान केला. त्याचा समाचार घेत नाना पटोले यांनी सत्तेसाठी ढोंग करणारे, सोंग करणारे मोदी हे ढोंगीजीवी आहेत असा टोला लगावला.

यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाना पटोले हे धडाडीचे नेते आहेत. काँग्रेसला नानांच्या रुपाने चांगले नेतृत्व लाभले आहे. त्यांनी एकदा ठरवले की ते तडीस नेणारच असा त्यांचा स्वभाव आहे. आताही त्यांनी राज्यात काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार केला आहे. यात त्यांना यश येईल. लोकांपर्यंत पोहचून व गावोगावी जाऊन काँग्रेसला पुन्हा एकदा सोनियाचे दिवस आणू असा विश्वास व्यक्त करून थोरात यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानले.

अशोक चव्हाण म्हणाले की, नाना पटोले हे धडाडीचे नेते असून लोकाभिमुख पद्धतीने त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे यश येवो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. केंद्रात व महाराष्ट्रात काँग्रेसला भाजपाविरोधात लढायचे आहे. शेतकरी, सामान्य माणूस, यांच्याबाजूने काँग्रेसची ताकद उभी करायची आहे.

नाना पटोले यांनी सकाळी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विधानभवन परिसरातील सर्व महापुरुष तसेच दक्षिण मुंबईतील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हुतात्मा चौकात जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले. नंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावकेड लक्ष वेधण्यासाठी मंत्रालय ते गिरगाव चौपाची ट्रॅक्टर प्रवास केला व तेथून इंधन दरवाढ व महागाईचा निषेध करत बैलगाडीने ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत प्रवास केला.

ज्या ऐतिहासीक गोकुळदास तेजपाल सभागृहात काँग्रेसची स्थापना झाली होती त्याच गोकुळदास तेजपाल हॉलमध्ये आज राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत हुकुमशाही पद्धतीने वागणा-या व काळे कायदे आणून शेतक-यांना उद्धवस्त करणारे ‘मोदी सरकार चले जाव’ असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

नाना पटोले यांनी मुख्य कार्यक्रम सुरु होण्याआधी सर्व धर्मातील संत, महात्मे, धर्मगुरु यांचे आशिर्वाद घेतले. पदग्रहणावेळी नाना पटोले यांना फुले पगडी, महात्मा गांधींचा चरखा व घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी दुपारी नाना पटोले यांनी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून औपचारिकरित्या टिळक भवन येथे पदभार स्वीकारला.

या पदग्रहण सोहळ्याला महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जम्मू काश्मीरच्या प्रभारी रजनीताई पाटील, खा. सुरेश धानोरकर, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपतकुमार, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सवालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, उपाध्यक्ष मोहन जोशी, किसान काँग्रेसचे देवानंद पवार, काँग्रेस पक्षाचे आमदार, नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महिला प्रदेशाध्यक्षा संध्याताई सवालाखे यांनी भाजीपाल्याचा हार घालून नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मान्यवरांचा सत्कार केला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय लाखे पाटील व ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.