Home Election Maharashtra । हेलिकॉप्टरने एन्ट्री करत सरपंचाने घेतली शपथ

Maharashtra । हेलिकॉप्टरने एन्ट्री करत सरपंचाने घेतली शपथ

662

संगमनेरच्या आंबी दुमाला गावात जल्लोष

अहमदनगर ब्युरो : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आज एक अनोखा शपथविधी पार पडला. सरपंचपदाची शपथ घेण्यासाठी सरपंचाचे थेट हेलिकॉप्टरने आगमन झाले. मुख्यमंत्र्याचा शपथविधी पार पडतो तशाच दैदिप्यमान सोहळ्यात शपथविधी सरपंचाचा पार पडला. सरपंचाचे हेलिकॉप्टरने आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि बारा बैलांच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा शपथविधी सोहळा रंगला होता.

गावातील उद्योजक तरुण जालिंदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. शेकडो तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. जालिंदर गागरे व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात राहत असले तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. गावाचा सर्वांगिण विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावची निवडणूक लढवली आणी त्यांचे संपूर्ण पॅनल 9 पैकी 9 जागा जिंकून बहुमताने विजयी झाले. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण पुरुषाचे निघाल्याने जालिंदर गागरे आज सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले. गावचा विकास हेच ध्येय असल्याचं जालिंदर गागरे सांगतात.

ज्या पद्धतीने मंत्री, मुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडतो तशाच पद्धतीने आज ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांनी गावच्या विकासाची शपथ घेतली. गावाकडे चला हा नारा गांधीजींनी दिला होता त्याच ध्येयाने मी गावात आलो असून आजचा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी हेलिकॉप्टरने आल्याचं गागरे यांनी सांगितले.

संपूर्ण पॅनल निवडून आल्याने गावचा विकास करण्यासाठी मदत होणार असून सरकारी मदतीव्यतिरिक्त सुद्धा स्वतः खर्च करुन आम्ही गावचा कायापालट करु असे आश्वासन उपसरपंचांनी दिलं. तर आजचा सोहळा म्हणजे आमच्यासाठी दिवाळीच असल्याचे मत ग्रामपंचायत सदस्य रोहिणी नरवडे यांनी व्यक्त केले.

गावचा विकास करण्याचा ध्यास असलेला सरपंच लाभल्याने आज गावही आनंदी आहे. अशाच पद्धतीने राज्यातील प्रत्येक गावातील सुशिक्षित उद्योजक जर पुढे आले तर गाव सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.