Home National Indian Railways। एप्रिल महिन्यापासून रेल्वे सेवा सुरु होण्याची शक्यता

Indian Railways। एप्रिल महिन्यापासून रेल्वे सेवा सुरु होण्याची शक्यता

711

नवी दिल्ली ब्युरो : भारतीय प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कोरोना काळात मार्च महिन्यात बंद झालेली रेल्वे सेवा आता येत्या एप्रिल महिन्यापासून पूर्वव्रत होण्याची शक्यता आहे. सध्या काही विशेष गाड्या सुरु असल्या तरी पूर्ण क्षमतेने रेल्वे सेवा सुरु नाही.


मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव जसा कमी येत गेला तसे काही रेल्वे गाड्यांच्या सेवा सुरु करण्यात आल्या. या वर्षीच्या जानेवारीत जवळपास 250 मार्गावरच्या गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. सध्याचा विचार करता देशातील 65 टक्के रेल्वे गाड्यांची सेवा सुरु झाली आहे.

रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी गेल्या महिन्यात सांगितलं होतं की रेल्वेशी संबंधित सर्व भागधारकांशी चर्चा केल्यानंतर रेल्वेची सेवा सुरु करायची का नाही याचा निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असल्याने काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचंही ते म्हणाले होते.

सर्व रुटच्या रेल्वे गाड्या सुरु करण्यासाठी कोणतीही तारीख ठरवण्यात आली नाही. हा निर्णय रेल्वेच्या सर्व भागधारकांशी चर्चा करुन घेण्यात येईल असे भारतीय रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

एप्रिलमध्ये रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय झाला तर यामध्ये सर्व प्रकारच्या गाड्यांचा समावेश असेल असेही सांगण्यात येतंय. त्यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांसह शहरी लोकल सेवांचाही समावेश असणार आहे.

मुंबईचा विचार करायचा झाला तर सामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यासाठी काही वेळा आखून देण्यात आल्या आहेत. सध्या वेस्टर्न मार्गावर 704 लोकल गाड्या सुरु असून त्यामधून रोज जवळपास चार लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य मार्गावर 706 लोकल गाड्या सुरु असून त्यामधून साडे चार लाखांच्या वर प्रवासी प्रवास करताना दिसत आहेत.