Home Legal Highcourt । पत्नी खर्रा खाते हे घटस्फोटासाठी पुरेसे कारण नाही

Highcourt । पत्नी खर्रा खाते हे घटस्फोटासाठी पुरेसे कारण नाही

586

नागपूर खंडपीठाचा पतीला दणका

नागपूर ब्युरो : पत्नी खर्रा खाते, या कारणास्तव घटस्फोट दिला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. खर्रा खाण्याचे व्यसन गंभीर असले, तरी या कारणास्तव घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नसल्याचं सांगत हायकोर्टाने पतीची याचिका फेटाळून लावली.

नागपूरमधील शंकर आणि रिना या दाम्पत्याच्या घटस्फोटाच्या प्रकरणात नागपूर खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि पुष्पा गनेडीवाला यांनी हा निर्णय दिला. न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी बाल लैंगिक शोषणाबाबत याआधी दिलेल्या दोन वादग्रस्त निकालांमुळे त्या चर्चेत आल्या.

हे आहेत पतीचे आरोप?

नागपूरचे रहिवासी असलेल्या शंकर आणि रिना यांचे 15 जून 2003 रोजी लग्न झाले. रिना घरातील दैनंदिन कामं करत नाही. क्षुल्लक कारणावरुन वाद घालते, न सांगता माहेरी जाऊन एक-एक महिना राहते, आपल्याला रोज डबा करुन देत नाही, अशा आरोपांची सरबत्ती पती शंकर यांनी याचिकेत पत्नी रिनावर केली होती. पत्नीला खर्रा खाण्याचे व्यसन आहे. त्यामुळे तिच्या पोटाच्या आजारावर उपचार करण्यासाठी महागडा खर्च करावा लागला, असा दावाही शंकरने घटस्फोट मिळवण्यासाठी केलेल्या याचिकेत केला होता.

न्यायालयाचे म्हणणे काय?

खर्रा खाण्याचे व्यसन वगळता इतर आरोप सामान्य स्वरुपाचे आहेत, असे किरकोळ वाद संसारात होत राहतात, असं मत हायकोर्टाने व्यक्त केलं. पत्नी खर्रा खाते हा आरोप गंभीर आहे, मात्र त्या एकमेव कारणावरुन घटस्फोट दिला जाऊ शकत नाही, असं कोर्टाने स्पष्ट केलं. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि पुष्पा गनेडीवाला यांनी पतीची याचिका फेटाळून लावली.

लग्न टिकवण्यात अपत्यांचं हित

शंकरने याआधी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र ती फेटाळण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. शंकर आणि रिना यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा रिनासोबत, तर मुलगी शंकरसोबत राहते. मुलांचे हित शंकर आणि रिना यांचे लग्न टिकून राहण्यात आहे, असं मत कुटुंब न्यायालयाने व्यक्त केलं होतं. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या भूमिकेचं समर्थन केलं आहे.