मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची चर्चा
मुंबई ब्यूरो : राज्याच्या विदर्भात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विदर्भाच्या अकोला, अमरावती आणि यवतमाळ या शहरात लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची यावर चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.
अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.. काल जिल्ह्यात 498 कोरोनाचे रुग्ण सापडले तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर जिल्ह्यात कोरोनाची पुर्ववत परिस्थिती निर्माण होऊन पुन्हा लॉकडाऊन करण्याशिवाय प्रशासनाला पर्याय राहणार नाही.. अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व आस्थापना, हॉटेल्स, खाद्यगृहे, रेस्टॉरेंट, बार, लग्न समारंभ, सर्व प्रकारची दुकाने आदींसाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार रात्रीपासून प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.
या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महसूल आणि मनपा प्रशासनाव्दारे विशेष पथके गठीत करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश पथकांना देण्यात आले आहे. कोविड प्रतिबंधात्मक आदेशाचे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
वर्धा जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
वर्धा : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आला आहे. 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. लग्न व इतर कार्यक्रमासाठी 50 व्यक्तींचे बंधन, औषधी दुकाने व रुग्णालये सोडून इतर दुकाने व बाजारपेठा सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील.