सध्या रॉयल एनफिल्डची बुलेट अनेकांसाठी एक स्वप्न आहे. अशी ही लोकप्रिय बाईक घेण्यासाठी अनेक जण आपल्या कमाईतून पैसे मुद्दामहून वेगळे काढून ठेवतात आणि मग ही बाईक विकत घेतात. यावरून या बाईकच्या लोकप्रियतेची कल्पना यावी. पण समजा एखाद्या हॉटेल मध्ये केवळ एका वेळेचं जेवण केल्याने तुम्हाला ही बाईक मिळणार असेल तर? अनेक जण अगदी एका पायावर तयार होतील. मग अशीच पर्वणी बुलेट प्रेमींसाठी पुण्यातील मावळ भागातील हॉटेल शिवराज यांनी आणली आहे. हे हॉटेल विविध थाळ्यांसाठी प्रसिद्ध आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. बकासुर थाळी, रावण थाळी आणि अशा अनेक विविध कल्पक थाळ्यांची मेजवानी हे हॉटेल आणत असतं.
यावेळी केवळ कल्पकच नव्हे तर भन्नाट थाळी या हॉटेल ने आणली आहे. यात एखाद्या व्यक्तीने एकट्याने इथे मिळत असलेली ‘बुलेट थाळी’ नामक थाळी अगदी संपूर्णपणे केवळ एका तासांत संपवली तर त्या व्यक्तीस एक बुलेट मो’फत देण्यात येईल. पण थोडं थांबा आणि पुढचं वाचा. ह्या थाळीत तुम्हाला चार अख्खे पापलेट, सुरमईचे चार तळलेले तुकडे, भुर्जीच्या चार गच्च भरलेल्या वाट्या, त्यात चार वाटी रस्सा, भाकऱ्या, प्रॉन्स (कोळंबी) बिर्यानी आणि हे सगळं पचवण्यासाठी चार वाट्या सोलकढी आणि हे सगळं रिचवण्यासाठी चार बाटल्या पाणी असा जामानिमा असतो. त्यामुळे ही अख्खी थाळी काही किलोंची असते हे खवय्यांना लक्षात आलं असेलंच. त्यामुळे केवळ एकट्याच्या जीवावर एवढी अख्खी थाळी केवळ एका तासांत संपणे अशक्य वाटते. पण याचमुळे या संकल्पनेतलं खरं आव्हान आहे. अर्थात सामान्य माणसाला एवढं जेवण एका बैठकीत एकट्याला फस्त करणं अवघडंच. पण आपल्या येथील साताऱ्यातील एका पहिलवानाने हे आव्हान पुरं करून दाखवलं आहे.
त्याचं नाव सोमनाथ पवार असं आहे. सोशल मीडियावर या पहिलवान खवय्याचे अकाउंट दिसत नसले तरी त्याचे काही फोटोज बघायला मिळतात. आपण नकळत या पहिलवानाला शाबासकी देतो आणि त्याचं कौतुकही वाटतं. पण याच सोबत एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि ही थाळी खाणार्यांनी आपली खाण्याची मर्यादा लक्षात घेऊनच एकट्याने ही थाळी खावी का मित्र सवंगाड्यांसोबत, कुटुंबासमवेत खावी ह्याचा निर्णय घ्यावा. या थाळीची किंमती ह्या दोन प्रकारात असून त्यांच्याविषयी जास्त माहिती आपल्याला तिथे जाऊनच कळू शकेल. सोशल मीडियावर दिसणाऱ्या या हॉटेल च्या काही फोटोज मधून या हॉटेल विषयी माहिती मिळते.