Home Maharashtra Maharashtra । वन राज्यमंत्री दत्ता भरणेंकडून 33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीची घोषणा

Maharashtra । वन राज्यमंत्री दत्ता भरणेंकडून 33 कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीची घोषणा

मुंबई ब्युरो : तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राबवलेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार आहे. चौकशीसाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची घोषणा वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत केली. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तर देत घोळ नसल्याचं सांगितलं आहे, मग मंत्र्यांचा त्यांच्यावर विश्वास नाही का? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वृक्ष लागवडीच्या मुद्द्यावरुन विधानसभेत घमासान पाहायला मिळाले.

चौकशी सहा महिन्यात पूर्ण करणार

वृक्ष लागवडीची विधिमंडळाच्या समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी केली होती. त्या मागणीवर वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी विधिमंडळाची चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही चौकशी सहा महिन्यात पूर्ण केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्रात 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी 2014 ते 2019 या कालावधीत 2 हजार 429 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वन मंत्रालयाची धुरा होती.

नाना पटोले यांची मागणी काय होती?

वृक्ष लागवड हा तत्कालीन मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता, यात भ्रष्टाचार झाला आहे का? याची चौकशी करण्यासाठी विधिमंडळाची चौकशी समिती नेमावी, अशी मागणी नाना पटोले यांनी विधानसभेत केली. एक झाड किती किंमतीला खरेदी केले, कोणत्या नर्सरीमधून खरेदी केली गेली, याची माहिती समोर आली पाहिजे, अशी नाना पटोले यांनी मागणी केली.

फडणवीसांचा सवाल- मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?

दरम्यान, वृक्ष लागवडी संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तर दिलं आहे. 75 टक्के वृक्ष जिवंत आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, आता त्याच्यावर हे समिती नेमणार. म्हणजे मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का, त्यांना चुकीची माहिती दिली जात आहे का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिल्यानंतर राजकीय आखाड्यासारखा वापर केला, आम्हाला अडचण नाही, पण हे योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले.