मुंबई ब्युरो : भाजप सरकारच्या तुलनेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला व बालकांवरील अत्याचारांचे प्रमाण हजारोंच्या संख्येने घटले आहे. गतवर्षीचा आढावा घेणाऱ्या यंदा प्रकाशित झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात महिला व बालकांसंदर्भात ही बाब समोर आली आहे.
राज्यात सत्ता परिवर्तन होण्याआधी फडणवीस सरकारच्या काळात 2018 साली महिला अत्याचाराचे 35, 501 तर 2019 साली 37,112 इतके गुन्हे नोंदवण्यात आले होते. महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर 2020 साली मात्र महिला अत्याचाराच्या प्रमाणात 10 हजारांपेक्षा जास्त संख्येने घट झाली असून महिला अत्याचाराच्या 26,586 इतक्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तसेच 2018 मध्ये बालकांवरील अत्याचाराचे 15,544 तर 2019 मध्ये 17,517 गुन्हे नोंद झाले होते. 2020 साली मात्र बालकांवरील अत्याचाराचे हे प्रमाण तब्बल 6 हजारांनी घटून बालकांवरील अत्याचाराच्या 11,154 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
फडणवीस सरकारच्या काळात महिला व बालकांवरील अत्याचाराचा वाढता आलेख महाविकास आघाडी सरकारच्या काळात हजारोंच्या संख्येने घटल्याची बाब यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या आधारावर आर्थिक पाहणी अहवालात ही आकडेवारी सादर करण्यात आली आहे.