Home हिंदी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रेल्वे स्थानकावर विक्रीसाठी हक्काची जागा मिळणार

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रेल्वे स्थानकावर विक्रीसाठी हक्काची जागा मिळणार

594

खासदार कृपाल तुमाने यांच्या मागणीला यश; मध्य रेल्वे कडून लवकरच होणार प्रक्रिया

नागपूर : संत्र्याचा कालीफोर्निया म्हणून ओळख असलेल्या नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नागपूर व विभागातील रेल्वे स्थानकावर संत्रा विक्रीसाठी हक्काची जागा मिळणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या संत्र्याच्या  विक्रीसाठी जागा मिळावी, अशी मागणी रामटेकचे खासदार श्री कृपाल तुमाने यांनी केली होती. त्यावर तत्काळ दखल घेत मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जागा देण्याचे मान्य केले.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री संजीव मित्तल व विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार व रेल्वे अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी रामटेक मतदार संघातील मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकावर असलेलेल्या विविध समस्या मांडल्या. रामटेक लोकसभा मतदार संघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधत्व करणारे श्री तुमाने यांनी रेल्वेने सुरू केलेली रामटेक मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी किसान स्पेशल गाडी नागपूर स्थानकावरून सुरू करावी अशी मागणी केली. यामुळे शेतकऱ्यांचा माल इतर ठिकाणी पाठविणे सोयीस्कर होईल. यासोबतच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना रेल्वे स्थानकावर विक्रीसाठी जागा मिळावी ही मागणी केली.

त्यावर विक्रीसाठी जागा देण्याची तत्काळ मान्य करून, नागपूर व अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी किसान स्पेशल गाडी चालविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.  खासदार तुमाने यांनी नागपूर स्थानकावरून थेट दिल्लीसाठी रेल्वेगाडी नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते असे सांगून दिल्लीसह हावडा व गोरखपूर स्थानकापर्यंत रेल्वे सेवा सुरू करावी अशी मागणी लावून धरली.

संसदेच्या परिवहन समितीवर असलेले श्री कृपाल तुमाने यांनी, नागपूर वर्धा तिसऱ्या लाईन साठी जमीन अधिग्रहण संदर्भात येणाऱ्या अडचणी लवकरात लवकर दूर करण्याची मागणी केली. राज्यातील पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र असलेल्या बुटीबोरी येथे देशभरातून आलेले कामगार येथे कामाला आहेत. त्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सुमारे ४० किमी अंतर पार करून नागपूर स्टेशन गाठावी लागते. यामुळे बुटीबोरी रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा ही मागणी रेटून धरली. यासोबतच कळमेश्वरसह काटोल व नरखेड व मोवाड येथेही थांबा देण्याची मागणी केली.

कळमेश्वर एमआयडीसी तील कंपन्यांना त्यांच्या मालासाठी रेल्वे वाहतूक तत्काळ मिळावी यासाठी रेल्वे सायडिंगचे काम करावे अशा सूचना केल्या. मोवाड रेल्वे स्थानकावर तिकीट विक्री ठेकेदारास २४ तास उपस्थित राहावे अशा सूचना केल्या. याशिवाय येथे असलेल्या विजेचीव प्रवाशांसाठी पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली. नरखेड रेल्वे स्थानकावर असलेल्या विविध समस्या सोडविण्याच्या सूचना खासदार श्री तुमाने यांनी केल्या.