Home मराठी Maharashtra । उर्जामंत्री राउत यांनी शासनाच्या चार्टर्ड विमानाचा अनधिकृत वापर केला

Maharashtra । उर्जामंत्री राउत यांनी शासनाच्या चार्टर्ड विमानाचा अनधिकृत वापर केला

राज्याच्या उर्जामंत्र्याविरोधात भाजपने दाखल केली पोलिसात तक्रार


मुंबई ब्यूरो : सचिन वाझे प्रकरणात राज्याची ठाकरे सरकार बॅकफुटवर आलेली आहे अशातच ती आणखी अडचणीत सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यानंतर एका हप्त्यातच राज्य सरकारला दुसरा झटका वाझे प्रकरणात बसला. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख सुद्धा अडचणीत आल्याची चर्चा असतानाच आता काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. राऊत यांनी खाजगी कामासाठी राज्य शासनाच्या चार्टर्ड विमानाचा अनधिकृतपणे वापर केला अशी तक्रार भाजपचे मीडिया प्रमुख विश्वास पाठक यांनी मुंबई येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात दिली आहे.

कोरोना महामारी मुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बेताची असताना ऊर्जामंत्री राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी न घेता राज्य शासनाचे चार्टर्ड विमान वापरले, असे पाठक यांनी मुंबई पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ज्या काळात विषाणूच्या साथीमुळे लॉकडाऊन करावे लागले व त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती नेमके त्याच काळात म्हणजे जुलै महिन्यात राऊत यांनी आपल्या खाजगी कामासाठी राज्य शासनाचा हा विमान वापरला असल्याचा आरोप पाठक यांनी केला आहे.

पाठक यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की नितीन राऊत यांनी नागपूर, मुंबई, हैदराबाद, दिल्ली, औरंगाबाद असा प्रवास केला आहे. हा प्रवास खाजगी कामासाठी होता. मुख्यमंत्र्यांची परवानगी न घेता राऊत यांनी परस्पर विमानाचा वापर केला. तसेच सरकारी कंपन्यांना बिले भरायला लावली त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी पाठक यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे.

या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्यायालयीन लढा दिला जाईल असा इशारा सुद्धा पाठक यांनी दिला आहे.