Home Health NAGPUR | आता एकच ‘अजेंडा’! नागपूरची बाधित संख्या कमी करून लसीकरण वाढविणे...

NAGPUR | आता एकच ‘अजेंडा’! नागपूरची बाधित संख्या कमी करून लसीकरण वाढविणे : डॉ. नितीन राऊत

मनपा व जिल्हा प्रशासनाला आराखडयावर कामकाज करण्याचे निर्देश

पालकमंत्री राऊत यांचा ठोस कृती आराखडा

  • उच्चभ्रू वस्तीतील चाचण्या वाढवा
  • हॉटस्पॉट भागांचे सूक्ष्म निरीक्षण
  • गर्दीच्या ठिकाणी अँटीजन टेस्ट
  • मेयो-मेडिकल खाटांचे व्यवस्थापन
  • होम कॉरन्टाइनवर सूक्ष्म नजर
  • लसीकरण दिवसाला ४० हजार
  • बेड-रिडन रुग्णांचे लसीकरण घरी
  • मास्क न वापरणाऱ्यावर कडक कारवाई
  • बाजारात कोविड प्रोटोकॉलचे पालन
  • खासगी रुग्णालयाच्या बिलींगवर लक्ष

नागपूर ब्यूरो : २२ ते ३१ मार्च पर्यंत नागपूर शहर व परिसरात कडक निर्बंध लावताना देशात अचानक नागपूर शहरात वाढत असलेले रुग्ण कमी करणे हाच मुख्य उद्देश आहे. त्यासाठी आगामी काळामध्ये नागपूर महानगर पालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी निश्चित कृति आराखडयावर वाटचाल करावी, असे आवाहन ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले आहे.

कालच्या बैठकीनंतर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज रविवारी सर्व यंत्रणांचा आढावा घेतला तसेच पुढील काळासाठी एक ठोस कृती आराखडा राबवण्याचे निर्देश दिलेत. नागपूर शहरातील धरमपेठ, लक्ष्मीनगर, हनुमान नगर या उच्चभ्रू वस्तीमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत असेल तर त्याचे नेमके कारण काय आहे? याचा शोध घेऊन या ठिकाणी अँटीजन टेस्ट सारख्या पर्यायातून चाचणी सुरू करण्याचे निर्देश, त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहे. शहरातील हॉटस्पॉट झालेल्या भागांमधील वैद्यकीय निरीक्षणे वाढविण्यासाठी त्यांनी सूचना केली असून ‘सँपल सर्वे’ किंवा काही घरांची माहिती घेऊन उच्चभ्रू वस्तीमध्ये वाढत असलेल्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने उपाययोजना आखण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

नागपूर शहरामध्ये ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती. त्या परिस्थिती प्रमाणे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खाटांची उपाय योजना करा. कोविड वार्ड पूर्ण क्षमतेने सुरू करा, ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला तसेच शहरी भागातील प्रत्येक कोरोना बाधिताला या दोन्ही शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध झाले पाहिजे तसेच कोणताही रुग्ण परत जाणार नाही, याची काळजी घेण्यात यावी असे स्पष्ट केले. गृह विलगीकरण ( होम कॉरन्टाइन ) असणाऱ्या काही रुग्णांना बाहेर फिरताना बघितल्याचे लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे. अशा बेजबाबदार नागरिकांना कोविड केअर सेन्टरमध्ये दाखल करून शिस्त निर्माण करावी. पाचपावली परिसरात केंद्र सुरू करण्यात आले आहे. अशाच प्रकारचे व्यवस्थापन अन्य ठिकाणी उभारणे आवश्यक असल्यास प्रशासनाने त्यासाठी तयार राहावे, असे निर्देशही त्यांनी आज दिले.

कोरोना संसर्गामधून बाहेर पडण्यासाठी लसीकरणाची गती वाढविणे सर्वात महत्त्वाचे आहे. ग्रामीण व शहरी स्तरावर आरोग्य विभाग यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र हे प्रयत्न युद्धस्तरावर करण्यात यावे. सध्या 80 ते 90 केंद्रांवर ग्रामीण व शहरी भागात लसीकरण सुरू आहे ते दीडशे पर्यंत वाढविण्यात यावे. सध्या 20 हजारापर्यंत दिवसभरात लसीकरणाचा एकत्रित आकडा येतो तो चाळीस हजारावर गेला पाहिजे,असे आवाहनही त्यांनी या वेळी आरोग्य यंत्रणेला केले. बेड रिडन रुग्णांना घरीच लसीकरण करण्यासाठी निश्चित कार्यक्रम आखण्यात यावा. आवश्यकतेनुसार मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण काही भागात राबविता येईल का याचीही शक्यता तपासण्याचे त्यांनी सांगितले.

व्यापारी -उद्योजक व दुकानदार संघटनांच्या विनंतीवरून चार वाजेपर्यंत सर्व आस्थापना सुरू राहणार आहेत. मात्र प्रत्येक आस्थापनांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे. मास्क घातलेला ग्राहक आतमध्ये येणार नाही. तसेच त्या ठिकाणी त्यांनी सॅनीटायझरचा वापर असावा, दुकानांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी व्यापार्‍यांनी घ्यावी, मात्र या सर्व बाबी पाळल्या जात आहेत, याची खातरजमा महानगरपालिका प्रशासनाने करावी व त्यासाठी विशिष्ट टीम नियुक्त कराव्यात. बाजारात ज्या आस्थापना नियमांचे पालन करत नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.