नागपूर ब्युरो : यंदा सोमवार, २९ मार्च रंगपंचमीचा दिवस नागपुरात आगीचा दिवस ठरला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीत लाखाेंचे नुकसान झाले. तीनही घटनेत आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
नागपुरातील सी. ए. रोडवर स्थित दोसर भवन येथील इकरा आटोमोबाईल अँड अॅक्सेसरीज या दुकानाला लागलेल्या आगीत अंदाजे सात लाखांचे नुकसान झाले. तर २ लाखांची बचत झाली. अग्निशमनदलाचे ८ बंब आग विझविण्यासाठी लागले.
दुसऱ्या घटनेत एसटीच्या पार्सल आॅफिसला लागलेली आग विझवायला तीन बंब लागले. यात पार्सलसोबत आलेला माल जळून खाक झाला. इथे नुकसानीचा आकडा कळू शकला नाही.
तिसऱ्या घटनेत काटोल रोडस्थित बोरगाव येथील युनिकाॅय ट्रेडींग कंपनीच्या जिनिंग मिलला आग लागली. आगीचे चार बंब कालपासून अाग विझवण्याचे प्रयत्न करीत आहेत. जिनिंग मिलच्या आवारातील विहिरीतून पाणी पुरवठा होत आहे. आग अजूनही नियंत्रणात आलेली नव्हती. नेमके किती नुकसान झाले कळू शकले नाही.