Home Maharashtra Maharashtra । मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनचा इशारा, दोन दिवसांत घेणार निर्णय

Maharashtra । मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनचा इशारा, दोन दिवसांत घेणार निर्णय

मुंबई ब्युरो : राज्यात कोरोना साथीचा विस्फोट झाला असताना आता नव्या काय उपाययोजना करणार याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. एप्रिलपर्यंत संयम बाळगावा लागेल. लॉकडाउनचा धोका टळलेला नाही, असं ठाकरेंनी सांगितलं. येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला असून येत्या दोन दिवसात दृश्य स्वरुपात नियंत्रण झाल्याचं दिसलं नाही तर लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन आपण टाळू शकतो, मात्र त्यासाठी जिद्द ठेवायला हवी. मी येत्या दोन दिवसात आणखी काही जणांशी बोलणार. लॉकडाऊन व्यतिरिक्त इतर काय पर्याय असेल यावर तज्ज्ञांशी बोलून ठरविण्यात येईल. सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करीत आहे की, यात राजकारण करू नका. नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे.

लॉकडाउन करणार का याचं थेट उत्तर मुख्यमंत्र्यांनी देण्याचं टाळलं. ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी यंदाही उपमुख्यमंत्र्यांनी चांगला अर्थसंकल्प मांडला. संकटातही महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही. काही दिवसांपूर्वी होळी, धुळीवंदनानंतर राज्यात शिमग्याला सुरुवात झाली. मात्र त्याविषयी नंतर बोलता येईल. मी तुम्हाला सातत्याने लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली आहे. ही शक्यता अजूनही टळलेली नाही. गेल्या महिन्यात राज्यातील सर्व नागरिकांनी माझं म्हणणं ऐकलं आणि त्यानुसार अंमलबजावणी केली.”

“गेल्या काही दिवसात लग्न समारंभ, राजकीय मोर्चे, कार्यक्रम थाटामाटात साजरे झाले. त्यावेळीही मी यावर नियंत्रण आणण्याचं आवाहन केलं. मार्चच्या आधीपासून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात कोरोनाने अक्राळ विक्राळ रुप धारण केलं आहे”, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी धोका टळलेला नाही हे स्पष्ट केलं.

विशेष म्हणजे कोरोना चाचण्याचं प्रमाण वाढवणे, तसंच कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेणे, लसीकरण वाढवणे असे काही प्रमुख अजेंडे हाती घेऊन त्यावर राज्य सरकार अधिक काम करण्याचा निर्णय घेईल, अशी माहिती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज नेमकी काय भूमिका जाहीर करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जितक्या चाचण्या आपण करत आहोत, त्यापैकी आयटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण अधिक असण्याची गरज आहे. यापुढेही आयटीपीसीआर चाचण्यांवर भर देण्यात येणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्राने कधीच रुग्णांबाबतची माहिती लपवली नाही. अनेकदा मला इतर राज्यांची आकडेवारी सांगितली जाते. मात्र आपल्याकडे कोणतीही बातमी लपविण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  1. -राज्यात दररोज अडीच लाख चाचण्या करण्याचं लक्ष
  2. -आरोग्य कर्मचारी, पोलीस, डॉक्टर यांची संख्या कशी वाढणार
  3. -काल तीन लाख नागरिकांचं लसीकरण
  4. -जगातील इतर देशांमध्ये परिस्थिती नाजूक झाली आहे.

    दरम्यान मुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहरात लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याचवेळी विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. 7 दिवसांसाठी पुणे शहरातील सर्व हॉटेल आणि मॉल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    पुण्यासाठी नवे नियम
    – शाळा कॉलेज 30 एप्रिलपर्यंत बंद
    – दहावी बारावीच्या नियोजित परीक्षा होणार
    – हॉटेल मॉल दोन आठवड्यांसाठी बंद, पण होम डिलिव्हरी सुरू राहील
    – ससून रुग्णालय क्षमता 500 बेडने वाढवणार
    – सर्व धार्मिक स्थळ 7 दिवस बंद राहणार
    – औद्योगिक कंपन्या सुरू राहतील