नागपूर ब्यूरो: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार 29 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे 14 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी 37605 नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. 1,71,61,500/- चा दंड वसूल केला आहे. मनपा उपद्रव शोध पथक व रेल्वे पोलिस बल यांनी संयुक्तपणे रेल्वे स्थानकावर मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई सुरु केली. दररोज ही कारवाई केली जात आहे.
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली असून कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी नागरिक सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.
मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत 4, धरमपेठ झोन अंतर्गत 1, हनुमाननगर झोन अंतर्गत 1, धंतोली झोन अंतर्गत 2, नेहरुनगर झोन अंतर्गत 6, गांधीबाग झोन अंतर्गत 4, सतरंजीपूरा झोन अंतर्गत 3, लकडगंज झोन अंतर्गत 1, आशीनगर झोन अंतर्गत 6 आणि मंगळवारी झोन अंतर्गत 1जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 500 रुपये प्रमाणे आतापर्यंत 32135 बेजबाबदार नागरिकांकडून रु 1 कोटी 60 लक्ष 67 हजार 500 वसूल करण्यात आले आहे.
नागपूरात रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.