क्रीडा सभापती प्रमोद तभाने यांनी केले मनपातर्फे अभिनंदन
नागपूर ब्यूरो: पोलंडच्या किलसेमध्ये सुरू असलेल्या युथ विश्व चॅम्पियनशिपमध्ये वर्चस्व गाजविताना भारताकडून नागपूरच्या अल्फिया पठाण हिने ८१ किलोपेक्षा अधिक वजनगटात सुवर्णपदक पटकावून देशाचे नाव उंचावले. प्रत्येक नागपूरकरांसाठी ही गौरवाची बाब असल्याचे सांगत नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा सभापती प्रमोद तभाने यांनी तिचे मनपाच्या वतीने अभिनंदन केले.
अल्फियाने अंतिम फेरी मालडोव्हाच्या कोझोरेझ डारियाचा ५-० ने पराभव केला. या स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सर्सनी वयोगटातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत गुवाहाटीमध्ये सन २०१७ च्या स्पर्धेत केलेली कामगिरी पिछाडीवर सोडली. अल्फियाने या स्पर्धेत पटकाविलेले यश मोठे असून आता तिचे लक्ष्य २०२४ चे ऑलम्पिक आहे. लॉकडाऊनच्या काळात तिचे भावासोबत नियमित सराव केला आणि यशाला गवसणी घातली. तिने घेतलेल्या मेहनतीला नागपूर महानगरपालिका सलाम करते आणि भविष्यातील यशासाठी तिला आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, या शब्दात सभापती प्रमोद तभाने यांनी तिच्या यशाचे कौतुक केले. तिच्या या यशात महत्त्वाचा वाटा असलेल्या तिच्या प्रशिक्षकांचेही त्यांनी अभिनंदन केले. अल्फिया पठाण हिची पोलंड येथील प्रस्तुत स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल नागपूर महानगरपालिकने दि. २५ मार्च च्या सर्वसाधारण सभेत अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.