नवी दिल्ली ब्युरो : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यानंतर या भेटीचे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत. शरद पवारांची मोदींसोबतची चर्चा केवळ प्रशासकीय आहे असं वाटत नाही. पियुष गोयल पवारांना भेटले होते. त्यानंतर राजनाथ सिंह भेटले. त्यानंतर आता मोदी-पवार भेट म्हणजे याला राजकीय अंग आहे. पूर्वी शरद पवार नरेंद्र मोदींना भेटले, महाराष्ट्रात 80 तासांचं सरकार बनलं, आता काय होईल?, असं म्हणत काही राजकीय विश्लेषक महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यसंदर्भात मोठं भाष्य करत आहेत. शरद पवार पहिल्यांदा पियुष गोयल यांना भेटले आणि त्यानंतर राजनाथ सिंह यांना भेटले. आता त्यानंतर शरद पवार-मोदी भेट होतीय. या भेटीला निश्चित राजकीय अंग आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समन्वयाचा सर्वात मोठा दुवा शरद पवार आहेत. महाराष्ट्रातील 48 जागा आहेत लोकसभेचा. त्यामुळे पवारांना महत्त्व आहे. त्या अनुषंगाने आतापासून तयारी असू शकते, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र, नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
कृषी कायद्यावर चर्चा?
संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे मोदींसोबतच्या बैठकीत कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि संरक्षणविषयक प्रश्नावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.